तळेरे गावठण येथील पांढरा आंबा येथे वहाळावर बंधारा; पाणी कामगारांच्या प्रयत्नांतून जलसंधारणाला चालना

0
37

तळेरे गावठण येथील पांढरा आंबा येथे वहाळावर बंधारा; पाणी कामगारांच्या प्रयत्नांतून जलसंधारणाला चालनातळेरे, दि. २५

आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करून तळेरे गावातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करता यावा, तसेच गावातील विहिरींची पाणीपातळी वाढविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने तळेरे गावठाणातील पांढरा आंबा परिसरात विहिरीजवळील वहाळावर बंधारा घालण्यात आला.

ग्रामपंचायत तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर व उपसरपंच संदीप घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या पाणी कामगार व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. यामध्ये संतोष मेस्त्री, रोहन मेस्त्री, सुनील कदम, सुनील घाडी आणि नंदू देसाई यांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलसाठ्यात वाढ करणे आणि विहिरींची पाणीपातळी टिकवून ठेवणे, हा या कामामागील प्रमुख उद्देश आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देणे शक्य व्हावे, या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून नियोजनपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.
विशेष म्हणजे, गावातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ग्रामपंचायतीचे पाणी कामगार व कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उतरून योगदान देत आहेत. त्यांच्या या कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत जलसंधारणाच्या माध्यमातून गावाचे पाणी सुरक्षित ठेवण्याचा ग्रामपंचायत तळेरेचा हा प्रयत्न आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी अशा उपाययोजनांना अधिक महत्त्व देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here