जनता विद्यामंदिर त्रिबंकमध्ये कोल्हापूर विभागीय शूटिंगबॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
पाच जिल्ह्यांतील ३२ संघांचा सहभाग; शालेय खेळाडूंच्या क्रीडाकौशल्याला मिळाले हक्काचे व्यासपीठ

आचरा, दि. २८ नोव्हेंबर
मैदानावर रंगलेली चुरशीची लढत, खेळाडूंचा उत्साह आणि क्रीडाप्रेमींची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण वातावरणात जनता विद्यामंदिर त्रिबंक, ता. मालवण येथे कोल्हापूर विभागीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेचा शनिवारी दिमाखात शुभारंभ झाला. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३२ संघांनी सहभाग घेतला असून, शालेय खेळाडूंच्या क्रीडागुणांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, पंचायत समिती मालवणच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत, संतोष कोदे, सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, अशोक बागवे, महेश बागवे, प्रफुल्ल प्रभू, डॉ. सुधीर मेहंदळे, अरविंद घाडी, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे, जिल्हा क्रीडाधिकारी मार्कंडेय धर्माई, शूटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम, सहायक क्रीडा अधिकारी वानखेडे मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, राष्ट्रीय पंच कोरगावकर, बबन गवस, संतोष कोदे, दत्ताजी पवार, डॉ. सिध्देश सकपाळ, मनोज हडकर, बाबू कदम, क्रिडा शिक्षक महेंद्र वारंग, रविंद्र गोसावी आदी मान्यवरांसह आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच जिल्ह्यांतील संघांचा सहभाग लाभल्याने स्पर्धेत चुरस आणि रंगत निर्माण झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याबरोबरच सांघिक भावना, शिस्त, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याची संधी मिळत आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जनता विद्यामंदिर त्रिबंकचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, माध्यमिक शिक्षण समितीचे पदाधिकारी आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शवित खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्रिबंकच्या क्रीडांगणावर विभागीय शूटिंगबॉल स्पर्धेचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.



