दुर्गामाता मैदान दशावतारप्रेमींनी फुलले! युवा सांस्कृतिक कलामंचाच्या आयोजनाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद ‘ना भूतो ना भविष्यती!’ रेकॉर्डब्रेक गर्दीत मालाडमध्ये ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’चा ऐतिहासिक नाट्य प्रयोग

0
1

दुर्गामाता मैदान दशावतारप्रेमींनी फुलले!

युवा सांस्कृतिक कलामंचाच्या आयोजनाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

‘ना भूतो ना भविष्यती!’ रेकॉर्डब्रेक गर्दीत मालाडमध्ये ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’चा ऐतिहासिक नाट्य प्रयोग 

मुंबई, दि. २८ नोव्हेंबर

युवा सांस्कृतिक कलामंच, मालाड यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्गातील प्रसिद्ध दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा शुद्ध पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या नाट्यप्रयोगाला मालाडकरांसह मुंबईतील दशावतारप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुर्गामाता मैदानात झालेली अलोट गर्दी आणि रसिकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर दशावतारमय झाला. या भव्य प्रतिसादामुळे नाट्यप्रयोगाने लक्षवेधी यश संपादन केले.

तामिळनाडूतील सुप्रसिद्ध मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचा पौराणिक इतिहास आणि धार्मिक महत्त्व उलगडणाऱ्या या नाट्यप्रयोगातून दशावतार कलेची समृद्ध परंपरा, पौराणिक कथानक, दमदार अभिनय, संगीत आणि रंगमंचीय सादरीकरणाचा सुरेख संगम रसिकांना अनुभवायला मिळाला. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयाने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुनील प्रभू साहेब (आमदार, मुख्य प्रतोद, कॅबिनेट दर्जा, शिवसेना नेते – उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी महापौर, मुंबई), श्री. प्रशांत कदम साहेब, श्री. सुनील गुजर साहेब, श्री. प्रशांत महाडिक आणि चेंदवणकर बुवा यांची विशेष उपस्थिती लाभली.

या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा सांस्कृतिक कलामंचाचे अध्यक्ष श्री. अरुण बागवे, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र पंडित, खजिनदार श्री. अशोक म्हाडगूत, कार्याध्यक्ष श्री. रुपेश भितये, तसेच श्री. दीनानाथ सावंत, श्री. ऋत्विक येरम यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मित्रपरिवार यांनी विशेष मेहनत घेतली.

कोकणच्या समृद्ध दशावतार कलेला मुंबईसारख्या महानगरात भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या युवा सांस्कृतिक कलामंचाच्या प्रयत्नांना रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मोठे यश मिळाले. या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, देणगीदार, हितचिंतक, सहकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित रसिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here