
शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ नऊ रात्रींचा उत्सव नव्हे, तर आपल्या अवतीभोवती अखंड कार्यरत असणाऱ्या स्त्रीशक्तीचा, तिच्यातील अथांग धैर्याचा, कर्तृत्वाचा आणि त्यागाचा भक्तीभावपूर्ण जागर! आदिशक्तीचे एक रूप संहारक असले, तरी तिचे दुसरे रूप संकटात आधार देणारे, संजीवनी बनून नवजीवन फुंकणारे आणि समाजाला स्थैर्याची दिशा दाखवणारे असते. या पावन पर्वावर अशाच एका ध्येयवादी, उपक्रमशील आणि सहकार व शिक्षणाचा संगम साधणाऱ्या ‘नवदुर्गे’चा गौरव करताना अंतःकरण उचंबळून येते… त्या म्हणजेच शिक्षक बँकेच्या सन्माननीय संचालिका आणि सध्या असलदे प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या सौ. ऋतुजा दिनेश जंगले!
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत ‘भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल’च्या माध्यमातून जेव्हा प्रचाराचा धुरळा उडाला होता, तेव्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेकडून जिल्हा महिला उमेदवार म्हणून सौ. ऋतुजा जंगले यांची झालेली निवड म्हणजे एका तळमळीच्या, कल्पक आणि संघटक स्त्रीशक्तीचा केलेला यथोचित सन्मान होता. एखाद्या संगीत मंचावर ‘मौसम बदल दिया’ अशी उत्स्फूर्त दाद मिळावी, अगदी तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि सकारात्मक ऊर्जेने निवडणुकीचा सारा माहोल बदलून टाकला. मे २०२३ मध्ये पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शिक्षक मतदारांनी त्यांच्यावर भरभरून विश्वास दाखवला; ऋतुजाताईंचा देदीप्यमान विजय झाला आणि त्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका म्हणून सन्मानाने विराजमान झाल्या!
रामायणात लक्ष्मण मूर्च्छित पडल्यानंतर हनुमंताने द्रोणागिरी पर्वतावरून आणलेली ‘संजीवनी’ साऱ्या रणभूमीवर नवचैतन्य पसरवून गेली होती. आजच्या काळात शिक्षक बँकेच्या सभासदांसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी ऋतुजा मॅडम अशाच एका ‘संजीवनी’च्या रूपात कार्यरत आहेत. नवनवीन अभिनव योजना राबवून शिक्षक बंधू-भगिनींना आर्थिक सुरक्षितता देणे आणि बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणणे, हा ध्यास घेऊन त्या संचालिका पदाची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत.
ऋतुजा मॅडम यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आठवली की मन भूतकाळात जाते. १९९८ च्या सुमारास सिंधुदुर्गात आम्ही नोकरीला लागलो, तेव्हा देवगड तालुका अत्यंत दुर्गम समजला जायचा. त्याच देवगड तालुक्यात, शिरगाव बीटमध्ये त्या पूर्वाश्रमीच्या ‘कविता बोडेकर’ म्हणून रुजू झाल्या. घरातूनच प्रतिभेचा वारसा आणि शैक्षणिक बाळकडू लाभलेल्या ऋतुजा मॅडमांचे ऱ्हाईम्स सादरीकरण, त्यांचा श्रवणीय आवाज, नृत्य आणि सभाधीटपणा आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. त्या ज्या स्पर्धेत किंवा प्रशिक्षणात असायच्या, तिथे पहिला नंबर त्यांचाच ठरलेला असायचा!
माझे जिवलग मित्र दिनेश जंगले यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाल्यानंतर फणसगाव बीटमध्ये जंगले दाम्पत्याची पुन्हा भेट घडली. उंडील तिठ्यावर अनेकदा गाठीभेटी होत. माझी दिवंगत पत्नी ऐश्वर्या आणि ऋतुजा यांची मैत्री केवळ मैत्रिणींपुरती मर्यादित नव्हती, तर त्या एकमेकींना सख्ख्या बहिणींसारख्या भासायच्या. २००७ मध्ये माझ्या पत्नीच्या निधनाचे दुःखाचे आभाळ कोसळले, तेव्हा दिनेश जंगले आणि संतोष राणे हे बंधू माझ्या त्या अतीव दुःखाच्या प्रसंगी खंबीरपणे धावून आले होते; त्यांच्या त्या मायेची आणि आधाराची परतफेड शब्दांत करणे अशक्य आहे.
काळाच्या ओघात तळेरे प्रभागात, साळीस्ते आणि शेर्पे केंद्रांच्या टॅग मिटींगच्या निमित्ताने ऋतुजा मॅडमची अभ्यासू वृत्ती आणि इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. यापूर्वी वारगाव नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी लिलया पेलली आहे, तर सध्या त्या असलदे प्राथमिक शाळेत आपले अध्यापनाचे व ज्ञानदानाचे कर्तव्य अत्यंत निष्ठेने बजावत आहेत. अध्यापन, सहकार आणि समाजकारण अशा सर्वच आघाड्यांवर त्या तितक्याच ताकदीने आणि आत्मविश्वासाने वावरत आहेत.
घटस्थापनेच्या या मंगल क्षणी, आदिशक्ती जगदंबेने संचालिका ऋतुजाताईंना शिक्षक बँकेच्या माध्यमातून सभासदांची सेवा करण्याचे, शिक्षकांच्या हिताचे रक्षण करण्याचे आणि यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्याचे अखंड बळ द्यावे. त्यांच्या हातून सहकार आणि शिक्षणाचा हा ऋतू असाच बहरत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!
©️ प्रवीण अशितोष कुबल
( ९८८१४७१६८४ )



