
जि. प. महिला व बालविकास सभापती अनुराधा नारकर यांची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांना निवेदन
तळेरे :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्लक्षित व पडक्या विहिरींचे सर्वेक्षण करून मुबलक पाणीसाठा असलेल्या विहिरींची स्वच्छता, गाळ उपसा आणि आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा नारकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जुन्या व दुर्लक्षित विहिरी अस्तित्वात असून, त्यांची अनेक वर्षांपासून योग्य देखभाल व साफसफाई झालेली नाही. मात्र, यातील काही विहिरींमध्ये आजही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा पर्जन्यमानात झालेली घट लक्षात घेता आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे नारकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांमधील अशा विहिरींचे सर्वेक्षण करून पाणीसाठा उपलब्ध असलेल्या आणि वापरासाठी योग्य ठरू शकणाऱ्या विहिरींची यादी तयार करावी. संबंधित पंचायत समिती, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभाग व इतर यंत्रणांच्या माध्यमातून विहिरींची माहिती संकलित करून त्यांची स्वच्छता, गाळ उपसा, झाडाझुडपांची साफसफाई आणि आवश्यक दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुर्लक्षित जलस्रोतांचे पुनरुज्जीवन झाल्यास ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन या कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही नारकर यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.



