उर्वरीत शेतकऱ्यांनी ई-केवायसी, बँक खाते व आधार संलग्नतेबाबत आवश्यक पूर्तता करावी
सिंधुदुर्ग दि. १३:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, नव्याने आणखी ९५३ आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यावर १ कोटी ३५ लाख हजार ५० रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत नुकसान भरपाई मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ३०८ झाली आहे.
जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी एकूण ३४ हजार ९३९ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ७५ कोटी ९४ लाख १९ हजार ९८४ रुपये निधीला पोर्टलद्वारे मान्यता दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २९ हजार ३०८ शेतकऱ्यांना ६४ कोटी ५३ लाख ०४ हजार ८४६ रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.
उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रियाही सुरू आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार २ हजार २१२ लाभार्थी शेतकऱ्यांची ४ कोटी ४१ लाख ४४ हजार रुपये रक्कम ई-केवायसी प्रलंबित असल्याने वितरित झालेली नाही.
नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे तसेच बँक खाते व आधार संलग्नतेबाबत आवश्यक पूर्तता करणे गरजेचे आहे. प्रलंबित लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय अथवा नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रामार्फत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.



