
ज्येष्ठांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – तळेरे सरपंच हनुमंत तळेकर
तळेरे, दि. १
सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाखा तळेरे पंचक्रोशी यांच्या वतीने ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मंगळवारी तळेरे येथील श्री दत्त मंदिरात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेरे गावचे सरपंच श्री. हनुमंत तळेकर होते.
या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. मराठे, विद्यमान तालुकाध्यक्ष श्री. राणे, साळीस्ते गावचे सरपंच श्री. प्रभाकर ताम्हणकर, तळेरे गावचे माजी सरपंच श्री. शशांक तळेकर, उपसरपंच श्री. संदीप घाडी, तळेरे पंचक्रोशी शाखेचे अध्यक्ष श्री. वामन ताम्हणकर, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत तळेकर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुहास पाताडे, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुरेश तळेकर, श्री दत्तसेवा मंडळाचे व्यवस्थापक श्री. सुरेश साटम, श्री. बापू वायंगणकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच देवतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ, तर सरपंच श्री. हनुमंत तळेकर यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कुटुंब, समाज आणि गावाच्या जडणघडणीत ज्येष्ठांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, तसेच त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ज्येष्ठांचे कार्य, त्याग आणि संस्कार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष श्री. मराठे, तालुकाध्यक्ष श्री. राणे, शाखाध्यक्ष श्री. वामन ताम्हणकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत स्मार्ट कार्ड:-
सरपंच हनुमंत तळेकर यांच्या योगदानातून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले स्मार्ट कार्ड मोफत उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचा उपस्थित जेष्ठ नागरिकांना लाभ झाला. यासाठी संबंधित प्रतिनिधी श्री. आळवे यांचेही सहकार्य लाभले.
सरपंच श्री. हनुमंत तळेकर यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश जाधव यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळीस्ते गावचे सरपंच श्री. प्रभाकर ताम्हणकर यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. राजेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले.



