नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर स्नेहल संदीप गोसावी : शिस्त, संगीत आणि ज्ञानतपश्चर्येची ‘स्वरदुर्गा’

0
44

 


शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ पारंपरिक विधी नव्हे, तर संसाराचा गाडा आणि ज्ञानदानाचे कर्तव्य या दोन्ही आघाड्यांवर तितक्याच समर्थपणे लढणाऱ्या अखंड मातृशक्तीचा हृदयस्पर्शी जागर! अज्ञानाचा अंधकार दूर सारून नव्या पिढीला सुसंस्कृत बनवणारी, हातात संस्कारांची मशाल आणि अंतःकरणात वात्सल्याचा झरा जपणारी खरीखुरी आदिशक्ती म्हणजेच आई आणि शिक्षिका. अशाच एका शिस्तप्रिय, संगीतसाधक आणि ध्येयनिष्ठ ‘नवदुर्गे’चा गौरव करताना मन कृतज्ञतेने आणि भावनिक आदराने दाटून येते… त्या म्हणजेच नवदुर्गा सौ. स्नेहल संदीप गोसावी (उच्च श्रेणी मुख्याध्यापिका, करंजे नं. १)!
पुण्याच्या ऐतिहासिक आणि सुसंस्कृत भूमीत जन्मलेल्या स्नेहल मॅडमचे वडील पोलीस दलात कार्यरत होते. त्यामुळे शिस्त, स्वाभिमान आणि समाजसेवेचे बाळकडू त्यांना अगदी पाळण्यातच लाभले. वडिलांच्या पोलीस खात्यातील बदल्यांमुळे बालपण विविध शहरांत घडले; रत्नागिरीच्या पोलीस हेडक्वॉर्टर शाळेतून चौथीपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर कुडाळ, पावशी आणि देवगड असा त्यांचा प्रवास राहिला. माध्यमिक शिक्षण देवगडच्या शेठ म. ग. हायस्कूलमधून पूर्ण झाले. त्यानंतर मिठबांव डी.एड. कॉलेजच्या (१९९१-९३) अत्यंत कडक, शिस्तप्रिय आणि संस्कारक्षम वातावरणात त्यांच्या शिक्षकवृत्तीची भक्कम पायाभरणी झाली. परिस्थितीची आव्हाने पेलत असताना शिक्षणाची भूक कधी मंदावली नाही; त्यांनी अत्यंत निष्ठेने पुढे बी.ए. आणि बी.एड. पर्यंतचे उच्च शिक्षण उत्तम गुणांनी पूर्ण केले.
ईश्वराचा वरदहस्त आणि आई-वडिलांच्या पुण्याईने देवगड तालुक्यातील ‘वेळगिवे गावठण’ या शाळेतून उपशिक्षिका म्हणून त्यांच्या ज्ञानतपश्चर्येची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर तळेरे नं. १ आणि २००१ मध्ये ओझरम नं. १ येथे त्यांनी मुख्याध्यापिका पदाची धुरा अत्यंत समर्थपणे पेलली. पुढे कर्याद नारूर नं. १, पावशी नं. १ अशा विविध शाळांमध्ये संस्कारांचे नंदादीप तेवत ठेवत, सध्या त्या ‘करंजे नं. १’ शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. “एकटा मुख्याध्यापक कधीही मोठा होऊ शकत नाही; सुखाचा वाटा सर्वांसोबत मिळून वाटला की शाळा आपोआप समृद्ध होते,” हा विचार त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर वाचन, सुंदर हस्ताक्षर, गीतगायन, ‘बांधावरची शाळा’, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण, कथाकथन, तंबाखूमुक्त शाळा, विद्यार्थिनींसाठी कराटे प्रशिक्षण, राखी तयार करणे, बोलक्या भिंती आणि लोकसहभागातून शैक्षणिक उठाव असे अनेक विविधांगी उपक्रम पालक आणि ग्रामस्थांच्या साथीने यशस्वी केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्याद नारूर शाळेचा विद्यार्थी निखिल सरनोबत २००७ मध्ये जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत प्रथम आला आणि आज तो पोलीस खात्यात देशसेवा करत आहे, ही त्यांच्या संस्कारांची उत्तुंग पावती! करंजे नं. १ शाळेत असताना २०१७ च्या ‘ज्ञानी मी होणार’ स्पर्धेत तन्वी नादीवडेकर आणि दीक्षा मळये या विद्यार्थिनींना त्यांनी थेट जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला. सरस्वती आणि संगीत यांना आपला प्राण मानणाऱ्या स्नेहल मॅडमच्या सुमधुर गायनकलेला शिक्षक समितीने नेहमीच मानाचे स्थान दिले; देशभक्तीपर गीते आणि कविता गायनाची संधी देऊन त्यांच्यातील कलावंताचा सातत्याने गौरव केला. त्यांच्या या प्रदीर्घ, अविरत आणि प्रामाणिक सेवेची दखल घेऊन ‘आविष्कार सोशल अँड एज्युकेशन, कोल्हापूर’ यांच्या वतीने ३० एप्रिल २०२४ रोजी त्यांना राज्यस्तरीय ‘क्रांतिसूर्य म. फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पण या संपूर्ण खडतर जीवनप्रवासात ज्या एका भक्कम आधाराचा उल्लेख केल्याखेरीज हा प्रवासच अपूर्ण राहील, तो आधार म्हणजे त्यांचे पती श्री. संदीप गोसावी सर! संसाराचे ऊन-पाऊस झेलताना, बदल्यांचे फेरे आणि शाळेचा प्रचंड व्याप सांभाळताना संदीप गोसावी सरांनी, माहेर-सासरच्या आप्तेष्टांनी आणि मुलांनी दिलेली अभेद्य साथ स्नेहल मॅडमच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी आणणारी आहे. “तू पुढे हो, आम्ही तुझ्या सोबत आहोत,” हा कुटुंबाने दिलेला मूक विश्वास हीच त्यांच्या संघर्षाची सर्वात मोठी ताकद ठरली.
शारदीय नवरात्राच्या या पावन क्षणी, “सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते” या मंगलमयी प्रार्थनेने आपण या आदिशक्तीला वंदन करूया. कुलदैवत बाप्पा आणि आदिशक्ती जगदंबेने स्नेहल मॅडम, संदीप सर आणि त्यांच्या संपूर्ण गोसावी कुटुंबाला उदंड, निरोगी आयुष्य आणि अखंड यश द्यावे, हीच अंतःकरणापासून सदिच्छा!
जय श्रीराम, जय दुर्गा!

©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*
( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here