नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर अन्विता अनिल ठाकूर : संस्कार, सोशिकता आणि ज्ञानतपश्चर्येची ‘मातृदुर्गा’

0
1

शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ पारंपरिक पूजेचा विधी नव्हे, तर संसाराचा गाडा आणि ज्ञानदानाचे कर्तव्य या दोन्ही आघाड्यांवर तितक्याच समर्थपणे स्वतःचे आयुष्य चंदनासारखे झिजवणाऱ्या अखंड मातृशक्तीचा हृदयस्पर्शी जागर! संकटांच्या आणि कर्तव्याच्या काटेरी वाटेवरून चालताना स्वतःच्या डोळ्यांतील वेदना मनातच दाबून ठेवणारी, परक्यांच्या लेकरांना पोटच्या पोराप्रमाणे मानून त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नंदादीप प्रज्वलित करणारी माऊली म्हणजेच खरी आदिशक्ती. अशाच एका अत्यंत सोशिक, कर्तव्यकठोर आणि ध्येयनिष्ठ ‘नवदुर्गे’चा गौरव करताना आज मन कृतज्ञतेने आणि भावनिक आदराने दाटून येते… त्या म्हणजेच नवदुर्गा सौ. अन्विता अनिल ठाकूर (पूर्वाश्रमीच्या आरती मोहन ठाकूर)!

कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य हरकुळ बुद्रुक हे त्यांचे जन्मगाव. त्या हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात आणि एकत्र कुटुंब पद्धतीच्या सुसंस्कृत, संस्कारक्षम वातावरणात त्यांचे बालपण संपन्न झाले. वडील मोहन ठाकूर आणि कुटुंबीयांच्या प्रेमाच्या छायेत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. प्राथमिक शिक्षण शाळा हरकुळ नं. ५ मध्ये पूर्ण झाल्यानंतर, माध्यमिक शिक्षण त्यांनी भगवंत सावंत विद्यालय, हरकुळ बु. येथून घेतले. त्यानंतर मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, कनेडी येथून बारावी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण होताना, विद्यार्थिनींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची मोहोर उमटवली! पुढे ‘सुनिता देवी टोपिवाला अध्यापक विद्यालय, मालवण’ येथून डी.एड.चे शिक्षण पूर्ण करून त्यांनी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात पदार्पण केले.

२५ एप्रिल २००८ हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे बंडवाडी येथे त्या उपशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तब्बल ११ वर्षे आणि ४ महिने या प्रदीर्घ काळात त्यांनी त्या शाळेला आणि तिथल्या चिमुकल्या लेकरांना स्वतःचे सर्वस्व मानले. अज्ञानाच्या सावलीत वावरणाऱ्या ग्रामीण मुलांच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्ने फुलवताना त्यांनी स्वतःच्या सुख-दुःखाची कधी पर्वाच केली नाही. त्यांच्या अखंड कष्टांचे फळ म्हणजे, सेवेच्या अगदी पहिल्याच वर्षी कासार्डे बंडवाडी शाळेने केंद्राची चॅम्पियनशिप पटकावली! उत्कृष्ट पटनोंदणी, STS परीक्षा, शिष्यवृत्ती, स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धांमध्ये थेट जिल्हास्तरापर्यंत झेप घेऊन त्यांनी बंडवाडी शाळेचा नावलौकिक वाढवला. त्या अकरा वर्षांच्या प्रवासात पालक आणि लेकरांनी त्यांच्यावर अथांग माया केली.

पुढे ऑनलाइन प्रशासकीय बदली प्रक्रियेतून त्या ‘जि. प. शाळा सांगवे नं. १’ येथे रुजू झाल्या आणि आज तिथे त्या मुख्याध्यापक पदाची धुरा अत्यंत समर्थपणे, माउलीच्या ममतेने सांभाळत आहेत. शाळा कोणतीही असो, अन्विताताईंचा ध्यास अखंड राहिला—माझ्या शाळेतील एकाही लेकराचे भवितव्य अंधारात राहू नये! सांगवे नं. १ शाळेतही त्यांनी STS परीक्षा, शिष्यवृत्तीची पूर्वतयारी, नवसाक्षरता अभियान आणि अनेक नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून शिक्षणाची गंगा अविरत वाहती ठेवली आहे. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर चित्रकला, रांगोळी आणि हस्तकलेच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त कलागुणांना बहर आणणारी ही शिक्षिका विद्यार्थ्यांसाठी साक्षात मायेची सावली ठरली आहे.

एका बाजूला संसाराची जबाबदारी, एकत्र कुटुंबाचे संस्कार जपणे आणि दुसऱ्या बाजूला मुख्याध्यापक पदाचा प्रचंड व्याप… हे सर्व सांभाळताना या माऊलीने स्वतःच्या वाट्याची किती सुखे मागे सोडली असतील, घरापासून शाळेच्या वाटेवर चालताना किती कष्टांचे घोट गिळले असतील, याचा विचार केला तरी अंतःकरण भरून येते आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात.

शारदीय नवरात्राच्या या पावन क्षणी, हरकुळच्या संस्कारांची समृद्ध शिदोरी उराशी बाळगून ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या या ज्ञानयोगिनीच्या चरणी मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने अन्विताताईंना अखंड आत्मबळ, उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावे. त्यांच्या त्यागातून आणि सेवेतून उजळलेला हा ज्ञानदीप सांगवेच्या अंगणात असाच तेवत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरणापासून आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!

 

©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*

( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here