
शारदीय नवरात्राची पावन घटस्थापना म्हणजे केवळ नऊ दिवसांचा उत्सव नव्हे, तर संकटांच्या खडतर मातीत स्वतःची पाळेमुळे घट्ट रोवून, अथांग संघर्षातून यशाचे आभाळ कवेत घेणाऱ्या अखंड मातृशक्तीचा डोळ्यांत पाणी आणणारा जागर! समाजाने कितीही बंधने घातली, तरी बापाच्या विश्वासाला पंख लावून आभाळात भरारी घेणारी, स्वतःच्या कष्टाने घराण्याचे नाव उज्ज्वल करणारी लेक म्हणजेच खरी आदिशक्ती. अशाच एका शेतात राबणाऱ्या बापाच्या स्वप्नांना सत्यात उतरवणाऱ्या, सांगलीच्या मातीतून कोकणाच्या ज्ञानमंदिरात ज्ञानदीप तेवत ठेवणाऱ्या लढाऊ ‘नवदुर्गे’चा गौरव करताना आज मन आणि डोळे दोन्ही कृतज्ञतेने पाणावल्याशिवाय राहत नाहीत… त्या म्हणजेच नवदुर्गा श्रीमती हेमा राजाराम वंजारी!
साखर कारखान्यातील काबाडकष्ट आणि शेतात अहोरात्र गाळलेला घाम… अशा अत्यंत साध्या आणि कष्टाळू शेतकरी कुटुंबात हेमा मॅडम लहानाच्या मोठ्या झाल्या. दोन लहान भाऊ आणि एकुलती एक बहीण; पण वडिलांनी मनात कधीही मुलगा-मुलगी असा भेद शिवू दिला नाही! “माझी पोरगी मुलापेक्षा कमी नाही,” असा विश्वास उराशी बाळगून वडिलांनी भावांसोबतच तिलाही पोहायला शिकवले, शेतातील कष्टांची कामे करायला लावली आणि अगदी रुबाबात बुलेट चालवण्याचे बळही दिले! तिन्ही भावंडे शेतात खुरपणी-नांगरणीची कामे करत, मातीशी एकरूप होऊन शिकली. एरंडोलीच्या जि. प. पूर्ण प्राथमिक मुलींच्या शाळेत पहिली ते चौथी आणि न्यू इंग्लिश स्कूल, एरंडोली येथे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत असताना आठवीतच त्यांनी ‘NMMS’ शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून आपल्यातील प्रखर बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.
न्यू इंग्लिश स्कूल, बेळंकी येथून अकरावी-बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर, सांगलीच्या ऐतिहासिक विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी.ची पदवी घेतली. केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे, तर खांद्यावर रायफल पेलत एन.सी.सी.चे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून मानाचे ‘सी’ सर्टिफिकेट (C Certificate) पटकावले! ज्या समाजात मुलींना फारसे शिकवले जात नाही, उंबरठ्याच्या आत ठेवले जाते, त्या परंपरेच्या भिंती तोडून या बापाने आपल्या लेकीला शिकवले. वडिलांच्या शब्दाखातर पुतळाबेन शाह गव्हर्नमेंट कॉलेजमधून बी.एड. करताना हेमा मॅडमने इतिहास घडवला—संपूर्ण शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तेत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये सातवा क्रमांक पटकावून बापाच्या कष्टाचे सोने केले! घराण्याच्या कित्येक पिढ्यांमध्ये नोकरी मिळवणारी त्या पहिलीच मुलगी ठरल्या.
बी.एड. करत असतानाच पहिल्याच प्रयत्नात कठीण मानली जाणारी ‘CTET’ परीक्षा उत्तीर्ण झाली. ज्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वतः शिकल्या, त्याच हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवण्याची जबाबदारी मिळाली. त्याच दरम्यान आयुष्यातली पहिलीच स्पर्धा परीक्षा ‘Tait’ दिली आणि पहिल्याच फटक्यात ती पात्र ठरली! २०२२ ला बी.एड. पूर्ण झाले आणि २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील ‘जि. प. शाळा शिडवणे नं. १’ येथे पदवीधर शिक्षिका म्हणून नियुक्तीचे आदेश हातात आले. २०२४ मध्येच त्यांचा विवाह झाला; जीवनसाथी पोलीस दलात देशसेवेत कार्यरत असल्याने त्यांच्याही खांद्यावर कर्तव्याची धुरा होती.
सांगलीची माती सोडून, कोसो दूर अनोळखी कोकणात येताना एका तरुण लेकीच्या मनात किती भीती आणि दडपण असेल, हे फक्त तिचा जीवच जाणत होता! ना कोणी ओळखीचे, ना कुठला आधार… पण शिडवणे नं. १ शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आणि नियतीने एका माउलीच्या पाठीशी देवमाणसे उभी केली. त्या शाळेतील तीनही सहकाऱ्यांनी तिला परकी न मानतात पोटच्या बहिणीसारखे जपले, कधी एकटे पडू दिले नाही. मुख्याध्यापक आदरणीय कुबल सरांनी केवळ प्रशासक म्हणून नव्हे, तर एका पितृतुल्य मार्गदर्शकाप्रमाणे स्वतःच्या हाताने तिला कार्यालयीन कामांचे धडे दिले, नव्याने शिकवले आणि तिला आत्मनिर्भर बनवले. आज अडीच वर्षांच्या सेवेनंतर, आयुष्यातील ही पहिली शाळा तिच्या काळजाचा ठोका बनली आहे… “ही शाळा मी मरेपर्यंत विसरू शकत नाही,” हे शब्द सांगताना त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्या मायेच्या ऋणाची साक्ष देतात.
शेतात माती तुडवणारे ते चिमुकले पाय, बापाने दिलेली बुलेटची मूठ, विद्यापीठात झळकलेला सातवा क्रमांक आणि घरापासून शेकडो मैल दूर येऊन आज ज्ञानदानात स्वतःला झोकून देणारी ही शेतकरी बापाची लाडकी पोर… हा जीवनप्रवास आठवला की छाती अभिमानाने दाटून येते आणि डोळ्यांतून पाणी वाहू लागते.
शारदीय नवरात्राच्या या मंगलमय पावन दिनी, शेतातल्या घामातून उगम पावून ज्ञानगंगेचा प्रवाह बनलेल्या या ‘स्वाभिमानदुर्गे’च्या चरणी मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने हेमा मॅडमांना अखंड यश, उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावे. त्यांच्या कष्टांची आणि संस्कारांची ही ज्योत अशीच तेवत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!
©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*
( ९८८१४७१६८४ )



