शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ नऊ रात्रींचा उत्सव नव्हे, तर आपल्या अवतीभोवती अहोरात्र कार्यरत असणाऱ्या मातृशक्तीचा, तिच्यातील अथांग धैर्याचा, कर्तृत्वाचा आणि त्यागाचा भक्तीभावपूर्ण जागर! आदिशक्तीचे एक रूप संहारक असले, तरी दुसरे रूप अज्ञानाचा अंधकार मिटवून वात्सल्याची उब देणाऱ्या आणि ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या जगदंबेचे असते. या मंगल पर्वावर शिक्षण क्षेत्राला आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि संघटनात्मक पातळीवरही कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अशाच एका उपक्रमशील, ध्येयवादी ‘नवदुर्गे’चा गौरव करताना मन कृतकृत्य होते… त्या म्हणजेच सौ. दर्शना धीरज हुंबे (पूर्वाश्रमीच्या वासंती बाबुराव खरात)!
कणकवली तालुक्यातील कोळोशी हे त्यांचे जन्मगाव. वडील पुण्यात किर्लोस्कर कमिन्समध्ये कार्यरत असल्याने त्यांचे संपूर्ण बालपण आणि शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूलमधून त्यांनी बालवाडी ते डी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महर्षी कर्व्यांच्या त्या पावन भूमीतील संस्कारांचे बाळकडू घेऊन त्या घडल्या. १९ मे १९९८ रोजी विवाहबद्ध झाल्यानंतर केवळ काहीच दिवसांत, ३ जुलै १९९८ रोजी निवड मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैभववाडी तालुक्यातील अरुळे येथे त्या सेवेत रुजू झाल्या. संसाराची नवी सुरुवात आणि नोकरीची आव्हाने एकाच वेळी पेलत असताना शिक्षणाची भूक मात्र थांबली नाही; लग्नानंतर जिद्दीने त्यांनी बी.ए., एम.ए. आणि बी.एड. पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली.
अरुळे, फोंडा ब्रम्हनगरी, तोंडवली नं. १ असा प्रवास करत, पुढे उच्चश्रेणी मुख्याध्यापिका म्हणून कुर्ली खडकदरा (ता. वैभववाडी), पदवीधर शिक्षिका म्हणून हरकुळ खुर्द नं. १, डामरे तिवरे नं. १ आणि समायोजनातून फोंडा सुतारवाडी अशा विविध शाळांमध्ये त्यांनी ज्ञानाचे नंदादीप तेवत ठेवले. सध्या त्या ‘लोरे बांबरवाडी’ येथे उपशिक्षिका म्हणून आपले कर्तव्य अत्यंत निष्ठेने बजावत आहेत. त्या ज्या ज्या शाळेत गेल्या, तिथे त्यांनी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालकांनाही आपलेसे केले. आजही जुन्या शाळांमधील पालक त्यांची आत्मीयतेने आठवण काढतात, हीच त्यांच्या कार्याची खरी पोचपावती आहे.
पालकांच्या सहकार्यातून त्यांनी शाळांमध्ये शिक्षणोत्सव, सुसज्ज संगणक कक्ष, डिजिटल शाळा, किशोरी मुलींसाठी प्रबोधन उपक्रम आणि शासनाचे विविध उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवले. कुर्ली खडकदरा शाळेत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानी मी होणार’ चा संघ थेट जिल्हास्तरापर्यंत पोहोचला होता. त्यांच्या या अष्टपैलू शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा ‘पटनोंदणी पुरस्कार’, ५ सप्टेंबर २०१७ रोजी नामदार दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते शिक्षक सेवा ‘गुरुगौरव पुरस्कार’, तसेच २०१७ मध्येच विद्यार्थी विकास मंच, कोल्हापूर यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता, सध्या त्या कणकवली तालुका शिक्षक समिती महिला सेलच्या कर्तबगार तालुकाध्यक्षा म्हणूनही अत्यंत समर्थपणे कार्यरत आहेत. शिक्षक भगिनींच्या प्रश्नांसाठी धावून जाणे, संघटनेची धुरा एकदिलाने सांभाळणे आणि प्रत्येकीला सोबत घेऊन चालणे या त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे महिला आघाडीत त्यांनी विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. शाळा आणि संघटना अशा दोन्ही आघाड्यांवर त्या एकाच वेळी तेवढ्याच समर्थपणे आणि निष्ठेने जबाबदारी सांभाळत आहेत.
घटस्थापनेच्या या पावन क्षणी, महर्षी कर्व्यांच्या संस्कारांची शिदोरी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या आणि शिक्षक समितीच्या महिला आघाडीचे समर्थ नेतृत्व करणाऱ्या दर्शना हुंबे यांच्या रूपाने आपल्याला आदर्श कर्मदुर्गेचे रूप पाहायला मिळते. आदिशक्ती जगदंबेने त्यांच्या कार्यकुशल हातांना अशीच अखंड ऊर्जा, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य द्यावे. त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाने अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून निघावे आणि त्यांचे नेतृत्व अधिक समृद्ध व्हावे, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!
©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*
( ९८८१४७१६८४ )




