पुस्तकांचे भव्य प्रदर्शन; ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालकांसाठी समृद्ध ग्रंथालय खुले
कुंभवडे (प्रतिनिधी):
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभवडे नं. १ येथे १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे व पुस्तकाचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध प्रकारच्या माहितीपूर्ण व ज्ञानवर्धक पुस्तकांचे भव्य ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचे, पालकांचे तसेच शालेय पोषण आहार मदतनीस यांचे ग्रंथ देऊन व वाचनात सहभागी करून घेऊन स्वागत करण्यात आले. वर्षानुवर्षे वाचनापासून दूर राहिलेल्या हातांमध्ये पुन्हा पुस्तके देऊन वाचनाची आवड निर्माण करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न यावेळी करण्यात आला.
🔸 *शाळेतील पुस्तके सर्वांसाठी खुली:*
वाचन केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता कायमस्वरूपी वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने शाळेतील समृद्ध ग्रंथालय आता केवळ शाळेतील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न ठेवता माजी विद्यार्थी तसेच गावातील सर्व नागरिकांसाठी कायमस्वरूपी खुले करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. गावातील कोणत्याही व्यक्तीने शाळेत येऊन वाचनासाठी पुस्तके न्यावीत आणि वाचन पूर्ण झाल्यावर परत आणून द्यावीत, जेणेकरून गावामध्ये वाचन चळवळ अधिक गतिमान होईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



