
शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ देव्हाऱ्यातील नऊ दिवसांचा पारंपरिक उत्सव नव्हे, तर बालपणी उराशी बाळगलेल्या एका इवल्याशा स्वप्नाला जिद्दीचे पंख लावून, संघर्षाच्या वाटेवर ताठ मानेने चालत समाजातील शेकडो लेकरांचे भविष्य घडवणाऱ्या अखंड मातृशक्तीचा काळजाला भिडणारा जागर! जेव्हा एखादी मुलगी परिस्थितीच्या मर्यादा ओलांडून, आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करत ज्ञानमंदिराच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होते, तेव्हा ती साक्षात दुर्गेचे तेज धारण करते. आज अशाच एका संवेदनशील, कर्तृत्ववान आणि गेल्या दोन दशकांपासून कणकवलीच्या शैक्षणिक क्षितिजावर ज्ञानाचा नंदादीप अखंड तेवत ठेवणाऱ्या ‘नवदुर्गे’चा गौरव करताना मन अत्यंत आदराने आणि अभिमानाने भरून येते… त्या म्हणजेच नवदुर्गा सौ. श्रेया संदीप नानचे (मुख्याध्यापिका, केंद्रशाळा फोंडा नं. १)!
लहानपणी इतर मुली अंगणात बसून भातुकलीचा, स्वयंपाकाचा खेळ मांडायच्या; पण पहिली-दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या श्रेयाच्या मनात मात्र वेगळाच ध्यास लागलेला असायचा! आईची जुनी साडी नेसून, हातात खडू-काठी घेऊन ती झाडांच्या सावलीत किंवा घराच्या पडवीत ‘शिक्षिका’ बनून वर्ग भरवायची. बालवयात खेळता-खेळता मनावर कोरले गेलेले ते शिक्षिकेचे स्वप्न नियतीने तिच्या नशिबात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले होते!
त्या जुन्या काळात अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या त्यांच्या दूरदृष्टी आईने लेकीच्या मनावर स्वाभिमानाचा एक विचार कोरला होता—”शिकले पाहिजे, नाहीतर आयुष्यभर रांधा-वाढा-उष्टी काढा हेच नशिबी येईल… स्त्री शिकली की तिची किंमत आणि सन्मान वाढतो!” आईची ही शिकवण आणि लेकीच्या नोकरीच्या परीक्षेसाठी, अर्जासाठी वडिलांनी केलेली ती वेळेची धावपळ… आई-वडिलांचा तो अथांग त्यागच श्रेया मॅडमच्या पंखांमधील खरी ताकद ठरला. पहिली ते बारावी आणि त्यानंतर मिठबाव येथून त्यांनी डी.एड.चे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतरही शिक्षणाची भूक शमली नाही; संसाराचा गाडा ओढत त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली आणि आज शिक्षणाची नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी त्या बी.एड.चे शिक्षण घेत आहेत!
३ ऑगस्ट २००४ हा त्यांच्या ज्ञानतपश्चर्येचा सुवर्णक्षण ठरला! देवगड तालुक्यातील ‘जि. प. शाळा किंजवडे खालचीवाडी’ येथे त्यांची प्राथमिक शिक्षिका म्हणून पहिली नेमणूक झाली. त्यानंतर २००८ मध्ये फोंडा गावठाण शाळा, २०१९ मध्ये केंद्रशाळा घोणसरी नं. १ येथे उपशिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे व्रत अविरत चालवले. आणि अखेर त्यांच्या २१ वर्षांच्या अखंड, प्रामाणिक सेवेची पावती म्हणूनच ४ ऑक्टोबर २०२५ पासून त्यांच्यावर ऐतिहासिक आणि मानाच्या ‘केंद्रशाळा फोंडा नं. १’ च्या मुख्याध्यापक पदाची अत्यंत जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली!
शाळेच्या चार भिंतींच्या आतील अध्यापनाबरोबरच क्रीडांगणावर विद्यार्थ्यांचा घाम गाळणे असो, की सांस्कृतिक रंगमंचावर त्यांच्या कलागुणांना पैलू पाडणे असो… श्रेया मॅडम प्रत्येक उपक्रमात स्वतः आघाडीवर राहिल्या. नृत्य आणि गायनाची मनापासून आवड असल्याने त्यांनी शाळेतील ग्रामीण विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडे बनवले नाही, तर त्यांच्या पंखांना आत्मविश्वासाचे बळ दिले. आज २१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी घडवलेल्या पिढ्यांमधील अनेक मुले-मुली मोठ्या पदांवर, उच्च हुद्द्यांवर कर्तृत्व गाजवत आहेत; त्या विद्यार्थ्यांचे यश हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अनमोल पुरस्कार ठरला आहे!
एका स्त्रीसाठी घर, संसार आणि शाळा यांचा समतोल साधणे म्हणजे तारेवरची कसरत असते. पण पती श्री. संदीप नानचे यांची मिळालेली भक्कम, खंबीर साथ आणि माहेरचे भक्कम पाठबळ यामुळेच त्या संकटांवर मात करत पुढे जात राहिल्या. आज त्यांची दोन्ही मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत असून आईच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या डोळ्यांत ओसंडून वाहत आहे.
लहानपणी भातुकलीच्या खेळात नेसलेली ती बालपणीची साडी, आईने दिलेली स्वाभिमानाची ती शिकवण, वडिलांची ती मूक धडपड, आणि २२ वर्षांच्या अविरत कष्टांनंतर आज केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिकेच्या खुर्चीत बसून हजारो लेकरांची माऊली बनलेली ही रणरागिणी… हा प्रवास आठवला की अंतःकरण हेलावल्याशिवाय आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळल्याशिवाय राहत नाहीत!
शारदीय नवरात्राच्या या पावन मंगलदिनी, साधेपणातून कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या आणि कणकवलीच्या भूमीत संस्कारांची गंगा वाहती ठेवणाऱ्या या ‘ध्येयदुर्गे’च्या चरणी मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने श्रेया नानचे मॅडमांना, संदीप नानचे सरांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला उदंड, निरोगी आयुष्य, अखंड सुख-शांती आणि कार्यक्षेत्रात उत्तुंग यश प्रदान करावे, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!
©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*
( ९८८१४७१६८४ )



