श्रीरामवाडी शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
– विद्यार्थ्यांना खेळता, फिरता मिळणार आनंदी शिक्षण
– लोकसहभागातून इमारतीचे रूपडेच बदलले
म्हापण, दि. २४
वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा श्रीरामवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि अंगणवाडीच्या भिंती आता बोलू लागल्या आहेत. खेळता, फिरता सहज शिक्षण या संकल्पनेतून विविध आकर्षक रंगीबेरंगी चित्रे, आकृत्या, नकाशे रेखाटण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे. दानशूर व्यक्ती आणि लोकसभागातून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्यामुळे शाळेचे रुपडेच पालटून गेले आहे.
दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून येथील मराठी शाळेबरोबरच अंगणवाडीचे रूप बदलून गेले. गाव करील ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय या उपक्रमाच्या निमित्ताने दिसून आला आहे. आपली मराठी शाळा अधिक ताकदीने उभी राहिली पाहिजे. येथे शिक्षण घेणार्या मुलांना शिक्षणाबरोबर चांगल्या इमारतीत शांत वातावरणात अभ्यास करता यावा याचा निश्चय करत ग्रामस्थांनी एकजूट केली.
लोकवर्गणी गोळा करताना दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींची आर्थिक मदत मिळवत शाळेची दुरुस्ती करण्यात आली. आकर्षक रंगरंगोटी करताना मुलांच्या नेहमी नजरेसमोर असणाऱ्या विविध चित्रकृती, नकाशे, कार्टून्स रेखाटण्यात आल्या आहेत. खेळता, फिरताना सत्तेत सतत नजरेसमोर येणाऱ्या या बोलक्या चित्रांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेला चालना मिळणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळवून देताना चांगला नागरिक म्हणून ओळख निर्माण व्हावी. पुढील वाटचालीस फायदा व्हावा यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे एक देखणी शाळा मुलाना अनुभवायला मिळाली आहे.
लोकप्रिय शैक्षणिक संकल्पना
शाळेच्या भिंतींवर आकर्षक चित्रे, नकाशे, गणिती सूत्रे, थोर पुरुषांची माहिती आणि शैक्षणिक साहित्य रंगवल्यामुळे शाळेत आनंदी वातावरणाची निर्मिती होते. शाळेचे वातावरण सुंदर आणि मुलांसाठी आकर्षणयुक्त बनते. विद्यार्थ्यांना खेळता, फिरता भिंतीवरील माहिती वाचून सहज अभ्यास आत्मसात करता येणार आहे.
सर्जनशीलतेला वाव
विद्यार्थ्यांना चित्रांद्वारे संकल्पना लवकर समजत असल्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढण्यास मदत मिळणार असून सर्जनशीलतेला वाव मिळणार आहे. ग्रामस्थांच्या मदतीने राबवलेला हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.



