जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबकची बाजी!
मुलींच्या दोन्ही वयोगटांत प्रथम क्रमांक
आचरा
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुली व मुलगे अशा चार गटांत झालेल्या या स्पर्धेत एकूण २१ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, आचरा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक देसाई मॅडम, तालुका क्रीडा अधिकारी वानखेडे मॅडम, माध्यमिक शिक्षण समितीचे उपाध्यक्ष अशोक बागवे, मालवण क्रीडा समन्वयक संजय पेंडुरकर, जनता विद्यामंदिर त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, रामगड हायस्कूलचे मुख्याध्यापक सावंत सर, कन्या शाळा मालवणचे मुख्याध्यापक शिंदे सर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक क्रीडाशिक्षक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
चार गटांतील विजेते संघ
१७ वर्षांखालील मुली :
– प्रथम – जनता विद्यामंदिर, त्रिंबक
– द्वितीय – सौ. ही. भा. वरस्कर वराड हायस्कूल
– तृतीय – सरस्वती हायस्कूल, नांदगाव
१७ वर्षांखालील मुलगे :
– प्रथम – पणदूर हायस्कूल
– द्वितीय – शेठ म. ग. हायस्कूल, देवगड
– तृतीय – कन्या शाळा, मालवण
१९ वर्षांखालील मुली :
– प्रथम – जनता विद्यामंदिर, त्रिंबक
– द्वितीय – पणदूर हायस्कूल
– तृतीय – कन्या शाळा, मालवण
१९ वर्षांखालील मुलगे :
– प्रथम – पणदूर हायस्कूल
– द्वितीय – कुडाळ हायस्कूल, कुडाळ
– तृतीय – देवगड कॉलेज
जनता विद्यामंदिर त्रिंबकने मुलींच्या १७ आणि १९ वर्षांखालील अशा दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी यश संपादन केले. तर पणदूर हायस्कूलने मुलांच्या दोन्ही वयोगटांत विजेतेपद मिळवत आपली छाप उमटवली.
पंचांचे मोलाचे योगदान
स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, राजू भावे, दाभोळकर सर, बाबू सकपाळ, जयवंत बागवे आणि वैभव सावंत यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक आणि आयोजकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांनी उपस्थित मान्यवर, पंच, क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक आणि सहभागी संघांचे आभार मानले.



