दळवी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचे श्रीपाद वेलिंग यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

0
16

दळवी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचे श्रीपाद वेलिंग यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

तळेरे, दि. २६ नोव्हेंबर 

संविधानातील लोकशाही मूल्यांचे जतन, नागरिकांच्या कर्तव्यांची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रास्ताविकात प्रा. नरेश शेटये यांनी संविधान दिनाचे महत्त्व आणि भारतीय संविधानाची भूमिका विशद केली.

मार्गदर्शन करताना श्रीपाद वेलिंग यांनी विद्यार्थ्यांनी संविधान समजून घेऊन त्यातील नैतिक मूल्यांचे आचरण करावे, असे सांगितले. विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात एकता आणि बंधुभाव निर्माण करून सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संविधान करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संविधानाप्रती जागरूक राहून महाविद्यालयीन उपक्रम आणि स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

यानंतर प्रा. प्रशांत हाटकर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या उपक्रमातून संविधानातील मूल्यांप्रती निष्ठा आणि नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांची जाणीव दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच २६/११/२००८ च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संविधान दिनानिमित्त आयोजित ‘माझे संविधान, माझा अभिमान’ या रील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संविधानविषयक विचार सर्जनशील पद्धतीने मांडले. स्पर्धेत बी.एस्सी. आयटी विभागाने प्रथम, बी.ए. (एमएमसी) विभागाने द्वितीय, तर बी.कॉम. विभागाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.ए. (एमएमसी) ची विद्यार्थिनी कु. दीप्ती कडू हिने केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. प्रशांत हाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here