जिल्ह्यातील १२८ ग्रंथालयांना ८५ लाखांच्या आराखड्याला लवकरच मंजुरी : जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत

सावंतवाडी, दि. २८ नोव्हेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२८ ग्रंथालयांना संगणकीय सॉफ्टवेअर, टेबल, खुर्च्या आदी भौतिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या आराखड्याला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून दिली जाईल. यासाठी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ‘मायनिंग फंड’ आणि ‘जिल्हा नियोजन निधी’तून निधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल, असे ठोस आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिले.
जिल्ह्यातील १२८ ग्रंथालयांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथालय संघ व प्रशासन यांची संयुक्त समन्वय बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी ग्रंथालयांच्या समस्या मांडल्या. “जिल्ह्यातील १२८ ग्रंथालयांच्या भौतिक सुविधांसाठी ८५ लाखांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, अनेक गावांमध्ये ग्रंथालयांना स्वतःची जागा नसल्याने अडचणी येतात. गावातील प्राथमिक शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये ग्रंथालये भरवल्यास शाळा आणि ग्रंथालय दोन्ही चळवळींना बळ मिळेल,” अशी मागणी मस्के यांनी केली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, “जिल्ह्यातील ६५ हून अधिक ग्रंथालयांना प्राथमिक शाळांमध्ये रिकाम्या वर्गखोल्या देण्यास आमची हरकत नाही. ग्रंथालय संघाने तालुकानिहाय मागणी अर्ज सादर करावेत. शिक्षण विभागाच्या पथकामार्फत पाहणी करून हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला जाईल.”
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड म्हणाल्या की, “आजची मुले मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्यांना पुन्हा वाचन व लेखन संस्कृतीकडे वळवण्यासाठी प्रत्येक गावात प्राथमिक शाळा आणि ग्रंथालय एकाच छताखाली असणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
या बैठकीस जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनीही ग्रंथालय चळवळीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातूनही ग्रंथालयांना निधी मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जि.प. सदस्य आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, सुमेधा पाताडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, उपाध्यक्ष रुजारिओ पिंटो, सहकार्यवाह महेश बोवलेकर, संचालक ॲड. संतोष सावंत, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सतीश गावडे, जयेंद्र तळेकर, दिशा परब, प्रवीण भोगटे, पाटणकर वाचनालयाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटणकर, ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे महेंद्र पटेल, प्रसाद जाधव, सौ. कशाळीकर, बापू सावंत, श्रीमती भिसे आदी उपस्थित होते.



