
सिंधुदुर्गनगरी:
डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या संकल्पनेतून एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) आणि माया एंटरप्रायजेस, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधुदुर्ग कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्वतयारी व जनजागृती अभियान’ अर्थात ‘साईराम’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
’साईराम’ अभियानाची ठळक वैशिष्ट्ये:
६० मिनिटांचा मोफत एआय क्लास: या अभियानांतर्गत www.mscit.ai या संकेतस्थळावरून अवघ्या ६० मिनिटांचा ‘एआय मास्टर क्लास’ पूर्णपणे मोफत पूर्ण करता येणार आहे.
डिजिटल प्रशस्तीपत्रक: हा क्लास यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सहभागींना डिजिटल प्रशस्तीपत्रक डाऊनलोड करून जतन करता येईल.
५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना संधी: जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता ५ वी ते १२ वीचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इच्छुक नागरिक यात विनाशुल्क सहभागी होऊ शकतात.
अभियानाचा कालावधी: हे अभियान ३१ ऑक्टोबरपर्यंत राबवले जात असून, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा आणि पालकांचा सहभाग
विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही एआयविषयक जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शाळांमार्फत विशेष बैठका आणि उपक्रम राबवून पालकांना प्रोत्साहित केले जात आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदेश किंजवडेकर आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुबोध माने अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करत आहेत.
शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या या संकल्पनेमुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत ‘एआय’चे प्राथमिक ज्ञान पोहोचून सिंधुदुर्ग जिल्हा तंत्रज्ञान साक्षर होण्याच्या दिशेने नक्कीच पुढे जाईल.



