तळेरे येथील गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ

0
18

पहिल्याच दिवशी भाविकांचा उत्तम प्रतिसाद; पारंपरिक पानांच्या वापरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

तळेरे / दि.१२ ऑक्टो. २०२६

तळेरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर-खर्जादेवी मंदिर परिसरात श्रीदेव गांगेश्वर – खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाला धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. रात्री भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री गरबा व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले. पहिल्याच दिवशी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

श्रीदेव गांगेश्वर – खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने भाविकांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला होता. आगामी दिवसांतही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

पारंपरिक पानांच्या वापरातून पर्यावरण संवर्धन

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. पूर्वी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये झाडांच्या पानांच्या पत्रावळी व प्लास्टिक द्रोणचा वापर केला जात असे. मात्र, कालांतराने प्लास्टिकच्या पत्रावळी व द्रोणांचा वापर वाढल्याने ही पारंपरिक पद्धत मागे पडली. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ लागल्याने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सामाजिक संस्था व प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर श्री गांगेश्वर खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळाने अल्पोपहारासाठी प्लास्टिकच्या द्रोणांऐवजी पारंपरिक चांदवडाच्या पानांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा मंडळाचा हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. परंपरेचे जतन आणि पर्यावरणाची काळजी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here