
सावंतवाडी : दि.१३
मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब आणि बास्केटबॉल स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सुशोभन संदीप सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, १४ वर्षांखालील मुलींच्या गटात अवनी निलेश सावंत हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या शानदार कामगिरीच्या जोरावर या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच मल्लखांब स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कुमार मानस सावंत याने पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
यासोबतच, १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत उत्तम खेळ करत द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी विशेष कौतुक केले असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



