नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर 🔹 सुरेखा कदम : स्वाभिमान, निस्वार्थ निष्ठा आणि मातृत्वाचा झंझावात!

0
2

शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ घट मांडून केलेली पूजा नव्हे, तर आपल्या अवतीभोवती अन्यायविरुद्ध पेटून उठणाऱ्या आणि स्वतःचे आयुष्य इतरांसाठी चंदनासारखे झिजवणाऱ्या आदिमायेचा, तिच्यातील असीम त्यागाचा आणि कणखर वात्सल्याचा अश्रुपूर्ण जागर! संकटाच्या वादळात जेव्हा सर्वजण हात टेकतात, तेव्हा स्वतःची पाठ देऊन वादळाला सामोरे जाणारी, डोळ्यांतील अश्रू गिळून चेहऱ्यावर लढाऊ बाणा मिरवणारी आई म्हणजेच खरी दुर्गा. अशाच एका वादळाशी झुंजणाऱ्या, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या स्वाभिमानी रणरागिणीचा गौरव करताना डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत… त्या म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सुरेखा कदम मॅडम!
समिती आणि सुरेखाताई यांचे नाते केवळ एका संघटनेचे किंवा पदाचे नाही, तर ते रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट अशा आत्मीयतेचे आहे. स्वाभिमान हा त्यांच्या रक्तातच उपजत वाहतो आहे; पण “समितीने मला घडवले, समितीमुळेच आज मी ताठ मानेने उभी आहे,” हे सांगताना त्यांचा कंठ दाटून येतो आणि तो प्रांजळपणा त्यांच्यातील ऋजुतेची साक्ष देतो. संघटनेवर त्यांनी केले ते केवळ प्रेम नाही, तर संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकणारे निरपेक्ष समर्पण आहे! आंदोलन असो, पायी मोर्चा असो, पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांची पर्वा न करता घोषणा देण्याचे प्रसंग असोत की अगदी दुर्गम भागातील तालुक्यात तातडीने पोहोचणे असो—सुरेखाताईंनी कधी घरातील अडचणींचा पाढा वाचला नाही, कधी आढेवेढे घेतले नाहीत. अंगात कणकण भरलेली असतानाही, घरात दुःखाचे प्रसंग असतानाही, “माझ्या शिक्षकांवर अन्याय होतोय” अशी एक हाक आली की ही वाघीण पदर खोचून मैदानात उतरली आहे!
तो काळ आठवला की आजही अंगावर काटा येतो… सिंधुदुर्गात संघटनेच्या मैदानात जेव्हा पुरुष शिलेदारांचीच गर्दी असायची, तेव्हा बोटावर मोजण्याइतक्या महिलांमध्ये सुरेखाताई एकट्या एका खांबासारख्या ठाम उभ्या असायच्या. त्यांचा तो स्पष्टवक्तेपणा, प्रशासनाला निरुत्तर करणारा सडेतोड अभ्यास आणि सत्यासाठी कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून बोलण्याचे धाडस पाहून भल्याभल्यांना नतमस्तक व्हावे लागायचे. पण या लढाऊ माऊलीचे मन स्वतःच्या एकाकी लढ्याने कधी समाधानी झाले नाही. त्यांच्या डोळ्यांत एकच स्वप्न होते—”माझ्या शिक्षक भगिनींनी उंबऱ्याच्या आत, संकोचाच्या सावलीत का कुढायचे? त्यांनीही अन्यायाविरुद्ध ताठ मानेने उभे राहिले पाहिजे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या हक्कासाठी गर्जले पाहिजे!”
याच आंतरिक तळमळीतून, रात्रीचा दिवस करून, प्रत्येक तालुक्यातील भगिनींची मने जिंकत त्यांनी तत्कालीन जिल्हा नेतृत्वाला साद घातली आणि २०२२ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी’चा पाया रचला गेला. एका झाडाच्या पारंब्या फुटाव्यात, तशी प्रत्येक तालुक्यात महिला आघाडीची वज्रमूठ निर्माण झाली. आज जेव्हा जिल्हा आणि तालुकास्तरावर शेकडो महिला भगिनी आत्मविश्वासाने ‘न्यायाची चाड, अन्यायाची चीड’ या ब्रीदाचा जयघोष करत रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्या गर्दीच्या पाठीशी सुरेखाताईंनी गाळलेला घाम आणि त्यांनी घेतलेले अश्रूंचे घोट आठवून ऊर दाटून येतो. त्यांनी आपल्या भगिनींवर टाकलेला विश्वास आज सार्थ ठरला आहे!
एवढ्या मोठ्या चळवळीचा डोलारा सांभाळताना या माऊलीने कधी शाळेतील चिमुकल्या लेकरांशी बेइमानी केली नाही. त्यांच्या आयुष्याचा एकच मंत्र राहिला—”आधी माझी शाळा, आधी माझी मुले आणि मग बाकी सर्व!” कुडाळ तालुक्यातील ‘पडतेवाडी’ या मोठ्या पटाच्या आणि नावाजलेल्या उपक्रमशील शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम करताना त्यांनी स्वतःच्या कामालाच देव मानले. एका हातात संसाराची जबाबदारी, दुसऱ्या हातात संघटनेचा झेंडा आणि हृदयाशी शाळेतील शेकडो लेकरांचे भविष्य… हे सगळे सांभाळताना त्यांनी किती रात्री जागून काढल्या असतील, स्वतःची किती सुख-दुःखे मनातल्या मनात दाबून ठेवली असतील, याचा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो आणि डोळे नकळत भरून येतात.
घटस्थापनेच्या या पवित्र मंगलदिनी, आदिशक्ती जगदंबेने आमच्या या लढाऊ आणि वात्सल्यमूर्ती सुरेखाताईंना उदंड, निरोगी आयुष्य द्यावे आणि त्यांच्या अंगातील ही संघर्षाची धग अशीच तेवत ठेवावी. त्यांच्या त्यागातून आणि संघर्षातून पेटलेली ही स्वाभिमानाची मशाल महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भगिनींच्या वाटेवर असाच प्रकाश देत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना डोळ्यांतील भावाश्रूंनी आणि अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आभाळभर मानाचा मुजरा!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here