🔴 नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर 🔹 मानसी मंगेश राणे : जिद्द, अखंड साधना आणि ज्ञानतपश्चर्येची ‘कर्मदुर्गा’!

0
67

शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ घट मांडून केलेली पूजा नव्हे, तर आपल्या अवतीभोवती संकटांच्या वादळांना सामोरे जात स्वतःचे आयुष्य इतरांसाठी चंदनासारखे झिजवणाऱ्या आदिशक्तीचा, तिच्यातील अथांग सोशिकतेचा आणि त्यागाचा अश्रुपूर्ण जागर! नियतीने कितीही आव्हाने समोर उभी केली, तरी पाय डगमगू न देता ताठ कण्याने उभी राहणारी, दुःखाचे घोट पचवून चेहऱ्यावर वात्सल्याचे हसू फुलवणारी माऊली म्हणजेच खरी दुर्गा. अशाच एका खडतर प्रवासातून तावून-सुलाखून निघालेल्या, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या स्वाभिमानी शिलेदाराचा गौरव करताना आज डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत… त्या म्हणजेच कणकवली प्रभाग अध्यक्ष नवदुर्गा श्रीम. मानसी मंगेश राणे (पूर्वाश्रमीच्या संगीता अनंत कदम)!
मालवण तालुक्यातील नयनरम्य सह्याद्रीच्या कुशीत आणि खळखळणाऱ्या गड नदीच्या काठावर वसलेले निसर्गरम्य किर्लोस गाव. याच मातीत १९७६ साली या दुर्गेचा जन्म झाला. वडील न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या समवेत उच्च पदावर कार्यरत असणारे; सुमारे ३५ वर्षे ते गुजरात (अहमदाबाद) येथे सेवेत होते. प्राथमिक शिक्षणाची पहिली चार वर्षे किर्लोस भावेवाडी शाळेत निसर्गाच्या सान्निध्यात सरली, पण पुढील शिक्षणासाठी या चिमुकल्या पायांनी थेट मुंबईची वाट धरली. अंबरनाथला काकांकडे राहून पाचवी ते दहावीचे शिक्षण घेताना डोळ्यांत एकच ध्यास होता—’मला शिक्षिका व्हायचे आहे!’ अंबरनाथच्या माध्यमिक शाळेत सर्वोच्च गुण मिळवून, यशाचे शिखर गाठल्यावरही त्यांचे पाय मातीची नाळ शोधत पुन्हा कोकणाकडे वळले. कणकवली डी.एड. कॉलेजमधून १९९४ साली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या स्वप्नांना नवा आकार दिला.
त्यानंतर सुरू झाला तो एका ध्येयवेड्या शिक्षिकेचा खडतर तपश्चर्येचा काळ! नवीनच सुरू झालेल्या ओरोस हायस्कूलमध्ये त्यांना अध्यापनाचा पहिला अनुभव मिळाला. माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी एन. के. जरग साहेबांसारखे अनुभवी अधिकारी स्वतः मागे बसून पाठांचे निरीक्षण करायचे; त्या तावून-सुलाखून निघालेल्या अनुभवातून अध्यापनाची ओढ, शिस्त आणि कार्यनिपुणता अधिकच वृद्धिंगत झाली. परिस्थितीच्या ओघात ती जागा सोडावी लागल्यानंतर, त्यांनी घराजवळच्या प्रगत विद्यामंदिर, रामगड येथे ज्ञानदानाची धुरा सांभाळली. पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या गड नदीच्या पात्रातून होडीने प्रवास करायचा, केवळ विद्यार्थ्यांच्या ओढीने रामगड हायस्कूल गाठायचे आणि पुन्हा संध्याकाळी भावेवाडीच्या घरी परतायचे… हा खडतर दिनक्रम सलग तीन वर्षे सुरू होता. काही अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे पुढे तो कार्यकाळ थांबला आणि दरम्यानच्या काळात इतर शासकीय भरतीच्या संधीही निसटून गेल्या होत्या. पदरी दाटून आलेली अनिश्चितता समोर उभी ठाकली होती, पण हार मानणे त्यांच्या स्वभावातच नव्हते!
विवाहानंतर तरळे मुक्कामी संसाराची सुरुवात झाली. ज्ञानदानाची तीव्र भूक शांत बसू देत नव्हती; म्हणून त्यांनी जिद्दीने स्वतःचे क्लासेस सुरू केले. त्या काळात समोर आव्हान होते ते आजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जयप्रकाश परब साहेबांच्या रूपाने! हे आव्हान अत्यंत समर्थपणे पेलत, त्यांनी वैभववाडी रोड, चापार्डे येथे अहोरात्र घाम गाळून शिकवणी वर्ग चालवले. एका शिक्षिकेच्या प्रामाणिक कष्टांचे फळ काय असते? आज त्यांच्या त्या वर्गांतून शिकलेले कौस्तुभ बावधनकर हे नामांकित न्यूरो-फिजिशियन आहेत, डॉ. मृदुला बावधनकर या एम.डी. गायनॅकॉलॉजिस्ट आहेत, तर श्वेता भडंगेंसह पाच ते सहा गुणवंत विद्यार्थी आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या दिमाखात रुग्णांची सेवा करत आहेत! शून्यातून उभा केलेला हा स्वाभिमानाचा डोलारा पाहताना कोणाच्याही डोळ्यांत कृतज्ञतेचे आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.
कष्टाची ही साधना अखेर फळाला आली. आदरणीय नारायणराव राणे साहेबांच्या आशीर्वादाने व सहकार्याने २००७ मध्ये त्यांना शासकीय सेवेत पुन्हा पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. केंद्र शाळा हळवल नं. १ येथे तब्बल १२ वर्षे विविध शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी या संधीचे सोने केले. त्यानंतर २०१९ मध्ये परमेश्वराने त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत भावुक क्षण आणला—ज्या शाळेच्या अंगणात त्या स्वतः बालपणी शिकल्या, त्याच किर्लोस भावेवाडी शाळेत त्यांना शिक्षिका म्हणून सेवा करण्याचे परमभाग्य लाभले! ज्या समाजाच्या आणि मातीच्या कुशीत आपण घडलो, त्याच शाळेचे ऋण फेडताना ग्रामस्थांचे अतोनात प्रेम आणि आपुलकी लाभली; त्यावेळी श्री देव रामेश्वराच्या चरणी त्यांचे डोळे नकळत भरून आले.
२०२५ मध्ये कणकवली तालुक्यातील दोन गावांमधील शिक्षणप्रेमींची मानबिंदू असणाऱ्या नामांकित ‘सातरल-कासरल’ शाळेत मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी अत्यंत समर्थपणे स्वीकारली. अधिकारी-कर्मचारी समजपूर्वक वाचन स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी स्वतःच्या ज्ञानाची धार पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आज कणकवली प्रभाग अध्यक्ष म्हणून शिक्षक समितीच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालताना, संघर्षाच्या निखाऱ्यांवरून चालून आलेली ही माऊली प्रत्येकाला विश्वासाचा आणि प्रेमाचा आधार वाटते.
नदीच्या पात्रातील होडीचा तो खडतर प्रवास, अनेक अनपेक्षित वळणांवर पचवलेले दुःख, जिद्दीने सुरू केलेले शिकवणी वर्ग आणि आज मुख्याध्यापक पदापर्यंत गाठलेली सन्मानाची उंची… हा प्रवास आठवला की छाती अभिमानाने भरून येते. देव गांगोलिंगेश्वराची अखंड कृपा आणि स्वतःच्या प्रामाणिक आत्मबळावर कार्यरत असणाऱ्या या लढाऊ माऊलीला आमचा शतशः प्रणाम!
घटस्थापनेच्या या पावन क्षणी, आदिशक्ती जगदंबेने मानसीताईंना कर्तव्यपथावर चालण्याचे अखंड बळ, उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावे. त्यांच्या त्यागातून आणि सेवेतून उजळलेला हा ज्ञानदीप सातरल-कासरलच्या अंगणात आणि अवघ्या शैक्षणिक विश्वात असाच तेवत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here