पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वसुंधरा पायी दिंडी १५ ऑक्टोबरला कणकवलीत
- ‘एक व्यक्ती, एक झाड’ संकल्पनेतून वृक्षसंवर्धनासाठी जनजागृत

तळेरे :
पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि निसर्ग रक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या वसुंधरा पायी दिंडीचे गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी कणकवलीत आगमन होणार आहे. ‘एक व्यक्ती, एक झाड’ या संकल्पनेतून हरित पर्यावरणाचा संदेश देणारी ही दिंडी नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणार आहे.
गोवा उपपीठ, बायंगिणी येथून १० ऑक्टोबर रोजी सुरू झालेली ही दिंडी नानिजधामच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. दररोज सुमारे २० ते २२ किलोमीटरचा पायी प्रवास करीत दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे महत्त्व, वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जनजागृती केली जात आहे.
विविध ठिकाणी स्वागताचे नियोजन
कणकवली तालुक्यात दिंडीच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. राणेवाडी, कसाल येथे सरपंच राजन परब यांच्या उपस्थितीत दिंडीचे स्वागत करण्यात येणार आहे. कोरगावकर हॉस्टेल, ओसरगाव येथे वनक्षेत्रपाल सुहास पाटील व पोलीस पाटील संजना आंगणे उपस्थित राहणार आहेत.
श्री गणेश मंदिर, वागदे येथे माजी आमदार वैभव नाईक व सरपंच संदीप सावंत यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात येणार असून, श्री चौंडेश्वरी सांस्कृतिक सभागृह येथे कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत दिंडीचे स्वागत होणार आहे.
झाडे लावा, झाडे जगवा!
केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या दिंडीच्या माध्यमातून दिला जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात येत आहे. वसुंधरा पायी दिंडीच्या आगमनामुळे कणकवली परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला चालना मिळणार आहे.




