
सिंधुदुर्ग:
जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने एका नाविन्यपूर्ण ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे. पालकमंत्री मा. ना. श्री. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. प्रमोद कामत यांच्या सूचनेनुसार, आरोग्य व शिक्षण सभापती मा. श्री. प्रितेश राऊळ यांच्या विशेष पुढाकाराने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सविस्तर माहिती:
दिनांक व वेळ: गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता.
स्थळ: प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.
उपक्रमाचे प्रमुख उद्देश व स्वरूप:
आरोग्य शिबिर: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयामध्ये भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाईल. यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांची तपासणी, आवश्यक चाचण्या आणि मोफत औषधोपचार केला जाईल.
आरोग्य कार्ड वाटप व योजना: शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती दिली जाईल तसेच आवश्यकतेनुसार नवीन अर्ज भरणे, आयुष्मान कार्ड (PMJAY), आभा कार्ड आणि वयवंदना कार्ड तातडीने काढून दिले जातील.
मान्यवरांच्या भेटी व ग्रामभेट: यात्रेदरम्यान नजीकच्या ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांना भेट देऊन पाहणी केली जाईल व आढावा घेतला जाईल.
अडचणी निवारण: प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत उपकेंद्रांच्या स्तरावरील अडचणी तातडीने सोडवण्यासाठी यावेळी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
माझं गावं आरोग्य संपन्न गावं: या मोहीमे अंतर्गत प्रत्येक गावात आरोग्याचा संदेश पोहोचवून नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थिती:
या कार्यक्रमाला लोकसभा सदस्य मा. श्री. नारायण राणे, विधानपरिषद व विधानसभा सदस्य, तसेच जिल्हाधिकारी मा. श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. अपूर्वा बासूर (भा.प्र.से.) आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. मोहन दहिकर (भा.पो.से.) यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला निरोगी आणि सक्षम बनवण्यासाठी या ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रेत’ जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



