
शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ देव्हाऱ्यातील नऊ दिवसांची पूजा नव्हे, तर बालपणी वाट्याला आलेली दारिद्र्याची धग स्वतःच्या काळजात पचवून, समाजातील गरीब लेकरांसाठी साक्षात दातृत्वाची सावली बनणाऱ्या अखंड मातृशक्तीचा डोळ्यांत पाणी आणणारा जागर! जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या वाट्याला आलेल्या अभावाचे रूपांतर इतरांच्या वाट्याला सुखाचा प्रकाश देण्यासाठी करते, तेव्हा ती साक्षात दुर्गेचे रूप बनते. आज अशाच एका हळव्या, कष्टाळू आणि गेल्या २६ वर्षांहून अधिक काळ ज्ञानमंदिरात मातेच्या वात्सल्याने अखंड सेवा देणाऱ्या ‘नवदुर्गे’चा जीवनगौरव करताना अंतःकरण अत्यंत हेलावून जाते… त्या म्हणजेच नवदुर्गा सौ. शामल मंगेश तळदेवकर!
कणकवलीच्या कनकनगरातील निसर्गाच्या साक्षीने त्यांचे बालपण अत्यंत साधेपणाने पण मोठ्या संघर्षात गेले. घरात चार बहिणी आणि अथांग गरिबीची सावली! उपाशीपोटी दिवस काढताना त्या स्वाभिमानी आईने केलेले काबाडकष्ट आणि मोठ्या बहिणीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शामलताईंनी परिस्थितीशी दोन हात करण्याचा निश्चय केला. “खूप शिकायचे, स्वतःच्या पायावर उभे राहायचे आणि लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सन्मानाचा बनवायचा,” हा एकच ध्यास त्यांनी उराशी बाळगला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून १९९५ मध्ये दहावीच्या परीक्षेत थेट डिस्टिंक्शन मिळवले आणि तिथून त्यांच्या आत्मविश्वासाला नवा पंख मिळाला! १९९७ मध्ये कणकवली कॉलेजमधून बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कणकवलीच्या कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयात डी.एड.साठी प्रवेश घेतला.
डी.एड.चे शिक्षण पूर्ण होताच ३ डिसेंबर १९९९ रोजी देवगड तालुक्यातील ऐतिहासिक ‘विजयदुर्ग नं. १’ या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि आयुष्याला एक नवे वळण मिळाले. नोकरी सांभाळत असतानाच ज्ञानलालसा स्वस्थ बसू देत नव्हती; अध्यापन करत करत त्यांनी बी.ए., एम.ए. आणि नंतर बी.एड.पर्यंतचे उच्च शिक्षण अत्यंत जिद्दीने पूर्ण केले!
लहानपणी स्वतः शिक्षण घेताना वह्या-पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याची होणारी असह्य चणचण त्यांनी जवळून अनुभवली होती. ते दुःख त्यांच्या काळजावर कायमचे कोरले गेले होते. म्हणूनच सेवेत रुजू होताच त्यांनी एक महान व्रत हाती घेतले—”दरवर्षी एका गरीब गरजू विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याला वर्षभराचे सर्व शैक्षणिक साहित्य स्वतःच्या खिशातून पुरवायचे!” स्वतःच्या बालपणीच्या अश्रूंचे परक्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावरील हास्यात रूपांतर करण्याचे हे व्रत त्यांनी गेली कित्येक वर्षे निष्ठेने पाळले आहे!
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी त्यांनी अहोरात्र स्वतःला झिजवले. शिष्यवृत्ती, मंथन, एसटीएस (STS), डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी जादा वेळ देऊन १००% निकालाची परंपरा राखली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरीची विद्यार्थिनी थेट ‘मंथन’च्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकली! तर क्रीडा स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी दिमाखात यश मिळवले. ‘तरंदळे देऊळवाडी’ शाळेत १२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. शाळेचा शैक्षणिक उठाव करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून सांस्कृतिक कार्यक्रम बसवले आणि त्यातून मिळालेल्या ५५,००० रुपयांच्या बक्षिसांमधून शाळेत विविध भौतिक व शैक्षणिक सुविधा उभ्या केल्या!
त्यानंतर ‘कळसुली गावडेवाडी’ शाळेत कमी पटसंख्या असताना, शाळा टिकवण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अंगावर काटा आणणारे आहेत! दूरवरच्या ‘आंब्रड’ भागातील एका विद्यार्थ्याला शाळेत टिकवण्यासाठी स्वतःच्या वाहनाने दररोज त्याच्या घरी जाऊन त्याला शाळेत आणणे आणि पुन्हा घरी सोडणे, ही अत्यंत मोठी जबाबदारी त्यांनी सलग तीन वर्षे अविरतपणे पेलली!
त्या केवळ एक आदर्श शिक्षिका नाहीत, तर त्यांच्यात एक हळवी कवयित्री आणि संवेदनशील कलाकार वसलेला आहे. बालसंस्कार, निसर्ग आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी रचलेल्या तब्बल १०० हून अधिक कवितांचा संग्रह त्यांच्या ठायी आहे; ही वही त्या विद्यार्थ्यांना वाचायला देऊन त्यांच्यातही कवितेचे बीज रोवतात. चित्रकला आणि रांगोळीत त्या निष्णात असून नवरात्रोत्सवातील रांगोळी स्पर्धांमध्ये त्यांनी सलग तीन वर्षे क्रमांक पटकावले आहेत. तसेच ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती’च्या महिला आघाडीमार्फत आयोजित जागतिक महिला दिनाच्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक मिळवून आपल्या लेखणीची ताकद दाखवून दिली आहे!
कनकनगरातील त्या गरिबीच्या झळा, आईच्या डोळ्यांतील ते मूक अश्रू, शिक्षणासाठी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी, आणि दुसऱ्याच्या लेकराला शिक्षणाची सामग्री देण्यासाठी दातृत्वाने उभी राहिलेली ही माऊली… हा प्रवास आठवला की अंतःकरण गहिवरून येते आणि डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळतात!
शारदीय नवरात्राच्या या मंगलमय पावन दिनी, माणुसकीचे मूर्तिमंत रूप असलेल्या आणि कणकवलीच्या ज्ञानक्षितिजावर वात्सल्याचा पाझर वाहणाऱ्या या ‘वात्सल्यदुर्गे’च्या चरणी मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने शामल तळदेवकर मॅडमांना, मंगेश तळदेवकर सरांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला उदंड, निरोगी आयुष्य, अखंड सुख, शांती आणि आत्मिक समाधान प्रदान करावे, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!
©️ प्रवीण अशितोष कुबलसर*
( ९८८१४७१६८४ )



