नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागरश्रावणी सतीश मदभावे : डिजिटल क्रांतीची मशाल, सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वासाची ‘तेजदुर्गा’

0
101

शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ देव्हाऱ्यात दिवा लावण्याचा विधी नव्हे, तर ग्रामीण भागातील अंधकार दूर करून तरुणाईच्या हातांना तंत्रज्ञानाचे बळ देणाऱ्या आणि समाजाला व्यसनमुक्तीचा नवा मार्ग दाखवणाऱ्या आदिशक्तीचा हृदयस्पर्शी जागर! जेव्हा एखादी कर्तृत्ववान स्त्री स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभी राहते आणि आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य उजळून टाकते, तेव्हा ती आधुनिक युगातील खरी ‘नवदुर्गा’ ठरते. आज अशाच एका तंत्रकुशल, सामाजिक भान जपणाऱ्या आणि ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाची गंगा अविरत वाहती ठेवणाऱ्या उद्योजिका ‘नवदुर्गे’चा गौरव करताना मन अत्यंत आदराने आणि अभिमानाने भरून येते… त्या म्हणजेच सौ. श्रावणी सतीश मदभावे (संचालिका, श्रावणी कॉम्प्युटर, तळेरे)!

मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या तळेरेच्या भूमीत आज ‘श्रावणी कॉम्प्युटर’ हे केवळ एक संगणक प्रशिक्षण केंद्र राहिलेले नाही, तर ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना धुमारे फुटण्याचे ते एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. ग्रामीण भागात जेव्हा कॉम्प्युटरचे ज्ञान घराघरांत पोहोचले नव्हते, तेव्हा एका स्त्रीने उद्योजकतेचे धाडसी पाऊल उचलले. पती श्री. सतीश मदभावे यांच्या खंबीर साथीने आणि स्वतःच्या अथांग परिश्रमाने त्यांनी या ज्ञानमंदिराची उभारणी केली.

गेल्या दशकभराहून अधिक काळ त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ एमएस-सीआयटी (MS-CIT) किंवा बेसिक कॉम्प्युटरचे धडे दिले नाहीत, तर डिजिटल जगाशी ताठ मानेने स्पर्धा करण्याचे धाडस दिले! संस्थेतील अद्ययावत सुविधा, आपुलकीचे वातावरण आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे समजावून सांगण्याची त्यांची पद्धत यामुळेच राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट केंद्र (Best Performing ALC – MKCL) म्हणून त्यांच्या संस्थेचा गौरव झाला आहे. आधुनिक काळातील एआय (AI) तंत्रज्ञान असो की विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी त्या नेहमीच आस्थेचा दीपस्तंभ ठरल्या आहेत.

पण श्रावणी मॅडमचे कार्य केवळ संगणकाच्या की-बोर्ड आणि स्क्रीनपुरते मर्यादित नाही! समाज घडवण्याची खरी तळमळ त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. भावी पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेला पुढाकार हा डोळ्यांत पाणी आणणारा आणि काळजाला भिडणारा आहे. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांनी बांधलेला रक्षेचा पवित्र धागा असो, अथवा व्यसनमुक्ती समितीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गावोगावी पेटवलेली जनजागृतीची ज्योत असो; एका मातेच्या काळजाने समाजातील तरुणाईला वाचवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड साक्षात दुर्गेच्या लढाऊ रूपाची साक्ष देते!

एक स्त्री म्हणून संसाराचा गाडा समर्थपणे हाकत असतानाच, स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळणे आणि समाजातील अनिष्ट रूढी-व्यसनांविरुद्ध ढाल बनून उभे राहणे… यासाठी लागणारे पोलादी मनोधैर्य शब्दातीत आहे. तळेरेच्या मातीत अनेक तरुणांना नोकरी-व्यवसायाची दिशा दाखवून त्यांच्या घराची चूल पेटवणारी ही माऊली म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आणि सरस्वतीचे मूर्तिमंत रूप आहे.

शून्यातून निर्माण केलेले संगणक विश्व, विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे घेतलेले व्रत, आणि समाजातील प्रत्येक लेकराला व्यसनांच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली ही अविरत धडपड… हा जीवनप्रवास पाहिला की आदराने मस्तक आपोआप झुकते!

शारदीय नवरात्राच्या या पावन मंगलदिनी, डिजिटल क्रांतीची मशाल हाती घेऊन समाजाला नवी दिशा देणाऱ्या या ‘तेजदुर्गे’च्या चरणी मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने श्रावणी मदभावे मॅडमांना, सतीश मदभावे सरांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला उदंड, निरोगी आयुष्य, अखंड सुख-समृद्धी आणि त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला उत्तुंग यश प्रदान करावे, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!

©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*

( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here