
पालकमंत्री नितेश राणे यांची तळेरे येथील गांगेश्वर मंदिरातील नवरात्रोत्सवाला भेट!
हिंदू जनजागृती उपक्रमाचे केले कौतुक; ‘तळेरे पॅटर्न’ देशभरात ओळखला जाईल असा व्यक्त केला विश्वास
तळेरे, दि. १७
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तळेरे येथील श्री गांगेश्वर मंदिराला भेट देऊन श्री गांगेश्वर आणि श्री खर्जादेवी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी कणकवलीचे पं.स.चे माजी सभापती तथा भाजपा ग्रामीण मंडळाचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर आणि मनोज ऊर्फ दादा तळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नितेश राणे यांचा सन्मान करण्यात आला.
माजी सरपंच शशांक तळेकर यांनी आपल्या दैनंदिन व्यस्त कामकाजातून वेळ काढून नवरात्रोत्सवाला भेट दिल्याबद्दल पालकमंत्री राणे यांचे आभार मानले. तसेच आमदार निधीतून आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा सादर केला. गेल्या पावणेदोन वर्षांपासून मंदिरात सुरू असलेल्या हिंदू जनजागृती उपक्रमाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, एक आपला आमदार,लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी प्रयत्न करणे हे माझं काम आहे “आपण दिलेल्या प्रेमामुळेच मला आमदार होता आले आणि त्याच माध्यमातून विकासकामे करणे शक्य झाले. आपल्या प्रेमामुळेच आज माझ्या नावापुढे पालकमंत्री आणि मत्स्योद्योग मंत्री ही जबाबदारी जोडली गेली आहे. आमदार असताना एवढी विकास कामे केलीत. आता तर पालकमंत्री पद आहे म्हणजेच अजून अधिक जोमाने विकास कामे करता येतील. आता जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्यात माझ्या हातात आहेत. त्यामुळे गावातील आवश्यक विकासकामे माझ्यापर्यंत पोहोचवा. ती पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. असा विश्वास व्यक्त केला.”
गावातील विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी दिलीप तळेकर यांच्यासारखे भारी भक्कम व खंबीर माणूस माझ्याजवळ देऊन ठेवला असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या माध्यमातून गावातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘तळेरे पॅटर्न’ संपूर्ण देशात ओळखला जाईल!
श्री गांगेश्वर मंदिरात सुरू असलेल्या हिंदू जनजागृती उपक्रमाचे कौतुक करताना पालकमंत्री नितेश राणे यांनी या उपक्रमाला विशेष दाद दिली. ते म्हणाले की, छोटेखानी स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. सध्या या उपक्रमाची महाराष्ट्रात चर्चा सुरू असून, भविष्यात हा उपक्रम संपूर्ण देशात ‘तळेरे पॅटर्न’ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शशांक तळेकर व राजेश जाधव यांनी केले. यावेळी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



