पारवाडी नदीवर बंधाऱ्याच्या हालचालींना वेग आचऱ्याची तहान भागविण्यासाठी नीलेश राणे सरसावले!

0
2

पारवाडी नदीवर बंधाऱ्याच्या हालचालींना वेग आचऱ्याची तहान भागविण्यासाठी नीलेश राणे सरसावले!

गोड्या पाण्याचा साठा वाढविण्यासह गाळ उपशालाही मिळणार चालना; आमदारांकडून नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी

आचरा

उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी आणि समुद्राला वाहून जाणारे गोडे पाणी अडवून त्याचा विनियोग करण्यासाठी आचरा येथे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने पारवाडी नदीवर बंधारा उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून, सोमवारी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी केली. बंधाऱ्याच्या उभारणीमुळे गोड्या पाण्याचा साठा वाढण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ आणि नदीतील गाळ उपशालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आचरा परिसराच्या जलसंवर्धनाला बळ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी आचरा गावचे सरपंच जेरॉन फर्नांडिस आणि ग्रामस्थांनी आमदार नीलेश राणे यांची भेट घेऊन पारवाडी नदीच्या मुखावर बंधारा उभारण्याची मागणी केली होती. समुद्राचे खारे पाणी रोखून गोड्या पाण्याचा साठा वाढविणे, तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश होता. ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार राणे यांनी सोमवारी दुपारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,मालवण गटविकास अधीकारी परागिणी पाटील,तालुकाध्यक्ष विनायक बाईत, जि. प. सदस्या वर्षा सांबारी, पं. स. सदस्य गणेश तोंडवळकर, मंदार लुडबे,सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, राजन गावकर, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, अनिल करंजे, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, चंदू कदम, पंकज आचरेकर,महेंद्र घाडी, श्रुती सावंत, सारंग, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले

बाबू कदम, गुरु कांबळी,ग्रामस्थ अरुण आपकर, श्रीपाद वायंगणकर, मुकेश सावंत,अजित घाडी यांच्यासह पारवाडी येथील ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंधाऱ्याच्या आराखड्यासह खर्चाचा अंदाज तातडीने सादर करण्याचे निर्देश

प्रस्तावित बंधाऱ्याची जागा निश्चित करणे, त्याची उंची ठरविणे आणि बांधकामासाठी येणारा खर्च यांचा सविस्तर अंदाज तातडीने सादर करण्याच्या सूचना आमदार नीलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यंदा बंधाऱ्याची चाचपणी आणि अंदाजपत्रकाची प्रक्रिया पूर्ण करून पुढील वर्षी पक्क्या बंधाऱ्याचे बांधकाम हाती घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

गाळ उपशामुळे नदीपात्रालाही मिळणार मोकळा श्वास

पारवाडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याच्या प्रवाहावर आणि साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या नियोजनासोबतच नदीतील गाळ उपशाचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनला कार्यादेश देण्यात आला असून, लवकरच गाळ उपशाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.

बंधाऱ्यात अडविण्यात येणाऱ्या गोड्या पाण्याचा आचरा परिसरासह मालवण तालुक्यातील अन्य गावांना उपयोग होऊ शकतो का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपक्रमामुळे जलसंधारणाला चालना मिळण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार नीलेश राणे यांनी घेतले ४१ दिवसांच्या गणरायाचे दर्शन.

आचरा दौऱ्यादरम्यान आमदार नीलेश राणे यांनी श्री देव रामेश्वर चे दर्शन घेऊन मंदिरातील चौघड्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ४१ दिवसांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दुष्काळाचे सावट दूर होऊन परिसरात पाण्याची सुबत्ता नांदावी, यासाठी त्यांनी मनोमन प्रार्थना केली. यावेळी देवस्थानचे सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते आमदार राणे यांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here