गरब्यातून सृजनाचे तत्त्वज्ञान, तरुणांना संस्कारांची शिकवण! तळेरेतील नवरात्रोत्सवाच्या जाहीर सभेत डॉ.मिलिंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन; स्त्रीसन्मान, इतिहासजागृती आणि सामाजिक एकात्मतेवर भर

0
43

गरब्यातून सृजनाचे तत्त्वज्ञान, तरुणांना संस्कारांची शिकवण!

तळेरेतील नवरात्रोत्सवाच्या जाहीर सभेत डॉ.मिलिंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन; स्त्रीसन्मान, इतिहासजागृती आणि सामाजिक एकात्मतेवर भ

तळेरे,
नवरात्रोत्सव म्हणजे केवळ देवीची आराधना, गरबा आणि दांडियाचा आनंद नव्हे, तर भारतीय संस्कृतीतील सृजनाचे तत्त्वज्ञान, निसर्गचक्र आणि सामाजिक मूल्ये समजून घेण्याची संधी आहे. गरब्यातील गर्भ, बीज आणि दीपगर्भाच्या प्रतीकात्मकतेतून सृष्टीची उत्पत्ती व जीवनाचे सातत्य उलगडते. तरुणांनी बुद्धी, वाणी, वागणूक आणि संस्कार हीच आपली शस्त्रे बनवून देशाचा गौरवशाली इतिहास पुढे न्यावा, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी तळेरे येथील श्री गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सवानिमित्त युवा वर्ग व उपस्थित ग्रामस्थांना केले.

गरबा हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून त्यामागे सृजन, ऊर्जा आणि जीवनचक्राचा प्रतीकात्मक विचार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मातीच्या घटातील दीप, त्याभोवतीची गोलाकार रचना आणि सामूहिक नृत्य यातून जीवनाचे सातत्य व सृष्टीचक्राचा अर्थ व्यक्त होतो. घटस्थापनेतील माती, पेरले जाणारे धान्य आणि त्यातून होणारे अंकुरण हीदेखील सृजनाची प्रतीके आहेत. त्यामुळे धार्मिक परंपरा केवळ विधी म्हणून न पाळता त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा वर्गाशी संवाद साधताना नालासोपारा येथील एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी महिलांची सुरक्षितता, धार्मिक स्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध समाजाच्या जागरूकतेचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचा दाखला देत स्त्रीचा सन्मान राखणे हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे मूल्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय स्त्री ही गौरीचे रूप असली, तरी अन्यायाविरुद्ध उभी राहताना ती दुर्गा आणि कालीचे सामर्थ्य दाखवू शकते, असे त्यांनी नमूद केले.

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत डॉ. कुलकर्णी यांनी भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची जाणीव तरुणांनी ठेवावी, असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप आणि बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले. जातीपातीच्या भिंती ओलांडून बौद्ध, जैन, शीख आणि हिंदू समाजाने परस्पर सन्मान व एकात्मतेच्या भावनेतून देशाच्या बळकटीसाठी एकत्र यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या युगात नवरात्रोत्सवाचा सांस्कृतिक वारसा आणि त्यामागील विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. भक्तीबरोबर विवेक, परंपरेबरोबर विचार आणि उत्सवाबरोबर सामाजिक जाणीव जपली, तर नवरात्रोत्सवाचे महत्त्व अधिक व्यापक होईल, असा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.

या प्रसंगी श्री गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुयोग तळेकर यांच्या हस्ते डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. श्री गांगेश्वर मंदिर येथे पावणे दोन वर्षांपासून दर सोमवारी सुरु असलेल्या हिंदू जनजागृतीपर व्याख्यानांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नवरात्रोत्सवाचे नेटके आयोजन, शिस्तबद्ध आरती आणि नियोजनाबद्दल मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. अखेरीस ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here