ना. जगन्नाथ तथा नाना शंकरशेट स्मारकाचा पायाभरणी सोहळा उत्साहात संपन्न 
मुंबई, दि. २३ नोव्हेंबर २०२६
वडाळा, मुंबई येथील बहुप्रतीक्षित ना. जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या भव्य स्मारकाचा पायाभरणीचा ऐतिहासिक सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्याला मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे येथील बहुसंख्य दैवज्ञ ज्ञातीबांधव, मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळी १०.३० वाजता सोहळ्याला सुरुवात झाली. स्मारकाच्या पायाभरणीचे यजमानपद नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. मनमोहन चोणकर व सौ. मीनल चोणकर उभयतांनी स्वीकारले. उभयतांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी घोषणांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी उपस्थित होते.
व्यासपीठावर परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, ॲड. मनमोहन चोणकर, डॉ. आनंद पेडणेकर, जयेश मालणकर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. रत्नपारखी म्हणाले, “हे स्मारक केवळ विटा आणि दगडांची वास्तू नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरेल.” ॲड. मनमोहन चोणकर म्हणाले, “आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जपण्याचे काम या वास्तूच्या माध्यमातून होणार आहे. हे स्मारक लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जाईल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि खुमासदार सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष, परिषदेचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सर्वश्री रवींद्र माहिमकर, सूर्यकांत कल्याणकर, अश्विन उपाध्याय, डॉ. विवेक रायकर, राजेश पोवळे, शशिकांत पावसकर, ॲड. सच्चिदानंद हाटकर, दिलीप मालंडकर उपस्थित होते.
मान्यवरांमध्ये सर्वश्री नंदाभाई राजपूरकर, डॉ. शाम भुर्के, चंद्रकांत पाटणकर, विजय पितळे, नंदू वळिवडेकर, अजित पितळे, जयेश बंदरकर, राजेश पनवेलकर, सिद्धेश डिगसकर, अशोक बहाडकर, सुभाष हरचेकर, जयवंत मालणकर, श्रीम. गीता वैद्य आदी उपस्थित होते.
ॲड. चोणकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. अल्पोपहारानंतर या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली.



