होडावडे येथील मंगेश माणगावकरांचा ५.१३८ किलो वजनाचा भला मोठा महाकाय नारळ ठरला लक्षवेधी! कृषी महोत्सवातील प्रदर्शनात या अनोख्या नारळाची चर्चा; कृषी विभागासह ठाणे-मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माणगावकर यांच्या शेताला दिली भेट

0
33

होडावडे येथील मंगेश माणगावकरांचा ५.१३८ किलो वजनाचा भला मोठा महाकाय नारळ ठरला लक्षवेधी!

कृषी महोत्सवातील प्रदर्शनात या अनोख्या नारळाची चर्चा; कृषी विभागासह ठाणे-मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माणगावकर यांच्या शेताला दिली भेट 

सावंतवाडी, दि.२६ नोव्हेंबर

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण यांच्या वतीने कट्टा येथे आयोजित ‘कृषी महोत्सव २०२६’ मधील वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादन प्रदर्शनात होडावडे (ता. वेंगुर्ले) येथील प्रयोगशील शेतकरी मंगेश माणगावकर यांचा तब्बल ५.१३८ किलो वजनाचा महाकाय नारळ उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. या अनोख्या नारळाची आणि त्याच्या मातृवृक्षाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे आणि मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच श्री. माणगावकर यांच्या शेताला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान या दुर्मिळ नारळाची उत्पत्ती, त्याची शारीरिक वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची निगा आणि योग्य खत व्यवस्थापन यावर उपस्थितांमध्ये सखोल व अभ्यासपूर्ण चर्चा झाली. माणगावकर यांची प्रगतशील शेती पद्धती आणि उत्तम व्यवस्थापन यामुळेच असा चमत्कार घडणे शक्य झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

या विशेष पाहणी प्रसंगी वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक, मालवणचे उप कृषी अधिकारी श्री. धनंजय गावडे, बांदा येथील उप कृषी अधिकारी श्री. एस. ए. सरगुरू, ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक श्री. केदार पाटील, “शेतीनिष्ठ शेतकरी” पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद देसाई, रिलायन्स फूड रिटेल एक्सपर्ट श्री. अनिरुद्ध कुलकर्णी आणि कृषी अभ्यासक श्री. संतोष बेर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी व कृषी तज्ज्ञांनी मंगेश माणगावकर यांच्या प्रयोगशील आणि सातत्यपूर्ण शेतीचे मनमोकळे कौतुक केले. तसेच या दुर्मिळ मातृवृक्षाचे योग्य संवर्धन आणि जतन कसे करावे, याबाबत त्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here