भालाफेकीत सिद्धार्थ जठारची सुवर्णभरारी; दळवी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठस्तरीय सुवर्णपदक! ५० मीटर भालाफेक करीत आंतरविभागीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

0
8

भालाफेकीत सिद्धार्थ जठारची सुवर्णभरारी; दळवी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठस्तरीय सुवर्णपदक!

५० मीटर भालाफेक करीत आंतरविभागीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपद

तळेरे, दि. २६ नोव्हेंबर :

मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या सिद्धार्थ यशवंत जठार याने भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ५० मीटर अंतरावर भालाफेक करीत त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. महाविद्यालयाच्या क्रीडा इतिहासात विद्यापीठस्तरीय भालाफेक स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक मिळविण्याचा मान सिद्धार्थने मिळविला.

यापूर्वी कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेतही सिद्धार्थने सुवर्णपदक पटकावले होते. आंतरविभागीय स्पर्धेतही या यशाची पुनरावृत्ती करीत त्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदविली.

सिद्धार्थच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग यांनी त्याचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असे त्यांनी सांगितले. सिद्धार्थच्या कामगिरीतून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि क्रीडा तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सिद्धार्थ महाविद्यालयात तृतीय वर्ष बीएएफ.चे शिक्षण घेत असून, त्याला क्रीडा विभागप्रमुख प्रा. विशाल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. हेमंत महाडिक यांचे प्रोत्साहन आणि महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण पाठबळही त्याच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी, व समन्वयक यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सिद्धार्थचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here