नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर अनुजा प्रवीण कदम : कला, कर्तृत्व आणि ज्ञानसंस्कारांची ‘नवदुर्गा’

0
0


शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ नऊ रात्रींचा उत्सव नव्हे, तर आपल्या अवतीभोवती अविरत कार्यरत असणाऱ्या मातृशक्तीचा, तिच्यातील अष्टपैलू कलागुणांचा आणि त्यागाचा भक्तीभावपूर्ण जागर! आदिशक्तीचे एक रूप संहारक असले, तरी दुसरे रूप विद्या, कला आणि सृजनाचे वरदान देणाऱ्या सरस्वतीचे असते. अशाच एका समर्पित, बहुआयामी आणि संस्कारक्षम शिक्षिकेचा गौरव करण्याचे भाग्य या नवरात्र पर्वात लाभले आहे… त्या म्हणजेच सौ. अनुजा प्रवीण कदम (पूर्वाश्रमीच्या धनश्री नारायण डवर)!
ज्ञान आणि कलेचा जेव्हा सुरेख संगम होतो, तेव्हा व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच झळाळी प्राप्त होते. कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमधून विज्ञान शाखेतून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, डी.एड. परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोवला होता. एवढ्यावरच न थांबता बी.एड. आणि एम.ए. पर्यंत उच्च विद्याविभूषित होत त्यांनी स्वतःला ज्ञानाने समृद्ध केले. गायन, नृत्य, वाचन, चित्रकला, कथाकथन आणि रांगोळी अशा चौसष्ट कलांचे वरदान त्यांना लाभले आहे. सुंदर हस्ताक्षर असो की निबंध आणि कविता लेखन, जिल्हा व राज्य स्तरावर त्यांनी मिळवलेली प्रथम क्रमांकाची पारितोषिके आणि दिवाळी अंक-मासिकांमधून प्रसिद्ध होणारे त्यांचे लेख त्यांच्यातील प्रगल्भ लेखिकेची साक्ष देतात. साक्षात सरस्वतीचा वास असणाऱ्या या ज्ञानदेवतेने शिक्षण क्षेत्राला आपले जीवन समर्पित केले आहे.
११ जानेवारी २००४ रोजी देवगड तालुक्यातील शिरगाव चौकेवाडी शाळेतून सुरू झालेला त्यांचा अध्यापनाचा प्रवास आज तब्बल २० वर्षे अखंड तेवत आहे. किंजवडे कोंडामा (देवगड), नांदगाव मधलीवाडी, नांदगाव नं. १, कोळोशी खडपडे आणि सध्या सांगवे कनेडीपेठ (ता. कणकवली) येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत. ज्ञानमीमांसा, समूहगीत, समूहनृत्य आणि क्रीडा स्पर्धांमध्ये मुलांची घेतलेली तयारी असो, की विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मितीत मिळवलेला द्वितीय क्रमांक असो; त्यांनी प्रत्येक शाळेचे नाव उंचावले आहे. कोळोशी येथे असताना लोकसहभागातून शाळेची केलेली सुंदर रंगरंगोटी असो, की नांदगाव येथे मुलींच्या पटनोंदणीत मिळवलेला प्रथम क्रमांक असो—त्यांच्यातील कर्तव्यदक्ष आणि संघटक दुर्गा नेहमीच अग्रभागी राहिली आहे.
केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. स्कॉलरशिप, STS, MTS यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांचा घडवलेला यशस्वी सहभाग असो, की महिला दिन, बालआनंद मेळावा, स्वावलंबन स्टॉल आणि ‘खरी कमाई’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेले स्वावलंबनाचे धडे असोत—त्यांच्या या उपक्रमांतून एक संवेदनशील समाजशिल्पी शिक्षिका स्पष्टपणे जाणवते. शिवजयंतीसारख्या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेत मिळवलेले यश आणि सामाजिक कार्यातील त्यांची सक्रियता समाजाला सतत नवी दिशा देत असते.
घटस्थापनेच्या या मंगल क्षणी, कला, साहित्य, शिक्षण आणि समाजकार्याची ही सुंदर वीण गुंफणाऱ्या अनुजा कदम यांच्या रूपाने आपल्याला आदर्श शिक्षकत्वाचे रूप पाहायला मिळते. आदिशक्ती जगदंबेने त्यांच्या कार्यकुशल हातांना अशीच अखंड ऊर्जा द्यावी, त्यांच्या संस्कारांतून घडणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडो आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध अवघ्या महाराष्ट्रात असाच दरवळत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here