
शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ नऊ रात्रींचा उत्सव नव्हे, तर आपल्या अवतीभोवती अहोरात्र तेवणाऱ्या मातृशक्तीचा, तिच्यातील अथांग सृजनशीलतेचा आणि त्यागाचा भक्तीभावपूर्ण जागर! आदिशक्तीचे एक रूप संहारक असले, तरी तिचे दुसरे रूप अज्ञानाचा अंधकार मिटवून वात्सल्याची उब देणाऱ्या आणि ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या जगदंबेचे असते. या पावन पर्वावर अशाच एका ध्येयवादी, उपक्रमशील आणि कलागुणांनी संपन्न ‘नवदुर्गे’चा गौरव करताना मन कृतकृत्य होते… त्या म्हणजेच सिंधुदुर्गच्या लाडक्या आदर्श शिक्षिका सौ. रश्मी आंगणे!
पुरस्कार मिळणे हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक अविस्मरणीय ठेवा असतो; पण तो सहज मिळत नाही. त्यासाठी चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन स्वतःला एखाद्या कार्यासाठी पूर्णपणे झोकून द्यावे लागते. ज्यांच्या अंगी असे निस्वार्थ सेवेचे धाडस असते, त्याच खऱ्या पुरस्काराच्या मानकरी ठरतात. रश्मी मॅडम या अशाच स्वयंप्रकाशी शिक्षिका आहेत. त्यांचे आडनाव ‘आंगणे’ आहे, म्हणजेच त्या नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या मूळ आंगणेवाडीच्या! आई भराडीदेवीचा वरदहस्त त्यांच्यावर सदैव राहिला आहे. कधी कधी वाटते, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी भराडीमाता जर प्रत्येकात अंशरूपाने वास करत असेल, तर तिच्या सृजनशील रूपाचा आविष्कार रश्मी मॅडमच्या कार्यात नक्कीच प्रतिबिंबित होतो.
त्यांच्या अध्यापनाचे पाठ प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मला मिळाली आहे. त्यांचे शिकवणे केवळ पुस्तकी नसते, तर ते थेट विद्यार्थ्यांच्या मनाला भिडणारे आणि विद्यार्थीकेंद्री असते. दैनंदिन जीवनातील साधी सोपी उदाहरणे देत विषय सहजतेने उलगडण्याची त्यांची शैली चिमुकल्या बालकांना अत्यंत आपलीशी वाटते. सातरल कासरल शाळेत असताना त्यांनी राबवलेले कल्पक नवोपक्रम मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहेत. बी.एड.च्या काळातही त्यांच्या अभ्यासू वृत्तीची आणि पाठांच्या दर्जेदार नियोजनाची चर्चा सर्वत्र व्हायची. एखादी गोष्ट एकदा मनावर घेतली की ती परिपूर्णतेने पूर्ण करण्याची त्यांची अदम्य जिद्द वाखाणण्याजोगी आहे; याच जिद्दीच्या बळावर त्यांच्या हातून अपूर्व शैक्षणिक कार्य सातत्याने घडत आहे.
सध्या त्या ‘कलमठ गावडेवाडी’ या शाळेत आपले कर्तव्य अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने बजावत आहेत. तिथेही आपल्या ज्ञानाचा व संस्कारांचा सुगंध दरवळत ठेवत त्या विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेत आहेत. रश्मी मॅडम म्हणजे साक्षात सरस्वतीचे वरदान लाभलेले व्यक्तिमत्त्व! त्यांचा आवाज अत्यंत श्रवणीय, गोड आणि भावस्पर्शी आहे. त्यांनी आपल्या सुरेल आवाजात पाठ्यपुस्तकातील कवितांचे केलेले गायन पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असेच असते. त्यांचे कथावाचन तर वाचिक अभिनय, शब्दांमधील आवश्यक विराम आणि ओघवती भाषा यांचा अप्रतिम त्रिवेणी संगम असतो. त्यांचे सूत्रसंचालन पाहिले की व्यावसायिक निवेदकालाही अचंबित करेल इतके ते नेटके, अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध असते. गुणवत्तेचा अखंड ध्यास घेऊन काम करताना त्यांची ऊर्जा आणि तळमळ पाहिली, तर आमच्यासारख्या सहकाऱ्यांनाही त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची प्रेरणा मिळते.
आपला विद्यार्थी ज्ञान आणि संस्कारांच्या प्रत्येक स्पर्धेत नेहमी एक पाऊल पुढे असावा, यासाठी त्या सदैव झटत असतात. ज्या शाळेत त्या पाऊल ठेवतील, तिथे शैक्षणिक सुवर्णमहोत्सव घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे. अशा हरहुन्नरी शिक्षिका लाभलेले विद्यार्थी खरोखरच भाग्यवान ठरतात. या यशाच्या आणि संघर्षाच्या प्रवासात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी असणारे त्यांचे पती रामचंद्र आंगणे साहेब यांची लाभलेली खंबीर आणि समंजस साथ म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाच्या आकाशाला मिळालेली सोन्याची किनार आहे. एका अर्थाने कर्तृत्व आणि सहचर्याची ही अतूट वीण जुळून आल्यामुळेच हा सन्मान खऱ्या अर्थाने रेशीमगाठीचा ‘रेशमी पुरस्कार’ ठरला आहे!
घटस्थापनेच्या या मंगल क्षणी, आदिशक्ती भराडीदेवीने रश्मी मॅडमना अशीच अखंड ऊर्जा, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य द्यावे. त्यांच्या ज्ञानाच्या नंदादीपाने अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून निघावे आणि कलमठ गावडेवाडीसह अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध असाच दरवळत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( ९८८१४७१६८४ )



