
शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ पारंपरिक उत्सवाचा सोहळा नव्हे, तर आपल्या अवतीभोवती प्रस्थापित चौकटींशी, नियतीशी आणि समाजाच्या पूर्वग्रहांशी झुंज देत स्वतःचे अस्तित्व स्वाभिमानाने सिद्ध करणाऱ्या मातृशक्तीचा, तिच्यातील असीम धैर्याचा आणि आत्मसन्मानाचा जागर! आदिशक्तीचे एक रूप संहारक असले, तरी दुसरे रूप वेदनेच्या अंधारातून स्वतःचा नवा जन्म घडवून आणणाऱ्या पराक्रमी जगदंबेचे असते. या पावन पर्वावर अशाच एका ध्येयवादी, अद्वितीय आणि ऐतिहासिक क्रांती घडवणाऱ्या ‘नवदुर्गे’चा गौरव करताना अंतःकरण गहिवरून येते… त्या म्हणजेच देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आळवेकर!
काही संघर्ष असे असतात जे रणांगणावर नाही, तर स्वतःच्याच शरीराशी आणि मनाशी लढावे लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील पूर्वाश्रमीच्या प्रवीण वारंग यांचा प्रवास हा साध्या संघर्षाचा नव्हता, तर तो अंतर्मनातील असह्य घुसमटीचा आणि अश्रूंचा महासागर होता. शरीराने पुरुष म्हणून वावरताना आतून मात्र प्रत्येक क्षणी स्त्रीत्वाची जाणीव पेटून उठायची. लहानपणापासून मनात दाटलेली ही खदखद कोणाजवळ व्यक्त करावी? समाजात उघडे पडलो तर काय होईल? या भीतीपोटी तब्बल २८ वर्षे त्यांनी ती वेदना छातीशी कवटाळून ठेवली. पण या सर्व मानसिक संघर्षातही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही; जिद्दीने डी.एड. पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू केले.
पण निसर्गाने लादलेल्या या विसंगतीमध्ये आयुष्यभर कुढत राहणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला मान्य नव्हते. स्वतःची खरी ओळख जगासमोर आणण्याचे अफाट धाडस दाखवत त्यांनी वैद्यकीय शस्त्रक्रियेचा अत्यंत खडतर, वेदनामयी मार्ग निवडला. ‘तो’ ते ‘ती’ हा प्रवास केवळ एका देहाचा बदल नव्हता, तर तो पुनर्जन्माचा महायज्ञ होता! या ऐतिहासिक प्रवासात तत्कालीन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद प्रशासन, सहकारी शिक्षक आणि समाजातील सहृदय घटकांनी दिलेली साथ त्यांच्या संघर्षाला बळ देऊन गेली. जेव्हा अधिकृतपणे कागदोपत्रांवर आणि समाजात ‘रिया आळवेकर’ हे नाव कोरले गेले, तेव्हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर अवघ्या तृतीयपंथी समुदायाच्या आत्मसन्मानाचा सुवर्णक्षण उजाडला. देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवून त्यांनी इतिहास रचला!
ओरोस बुद्रुक जिल्हा परिषद शाळा असो वा सध्याचे त्यांचे अध्यापन कार्य; शाळेच्या वर्गात पाऊल ठेवल्यावर त्या एक अत्यंत संवेदनशील, मायाळू आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून वावरतात. शाळेतील चिमुकली मुले त्यांना तेवढ्याच प्रेमाने ‘रिया मॅडम’ म्हणतात आणि पालकही त्यांच्या पाठीशी विश्वासाने उभे राहतात, हे दृश्य पाहताना डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत. ज्या समाजाने एकेकाळी तृतीयपंथीयांना उपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवले, त्याच समाजातील पुढची पिढी आज रिया मॅडमच्या संस्कारातून घडत आहे; यापेक्षा मोठी सामाजिक क्रांती कोणती असू शकते? शिक्षण, फॅशन विश्वातील स्वतःचे वेगळे स्थान आणि समाजकार्यातील तळमळ यांमधून त्यांनी दाखवून दिले की स्त्रीत्व हे देहाच्या चौकटीत नसून ते मनातल्या दातृत्व, वात्सल्य आणि कर्तृत्वात वसलेले असते!
घटस्थापनेच्या या पावन क्षणी, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकून समाजाला संवेदनशीलतेची नवी दृष्टी देणाऱ्या रिया आळवेकर यांच्या रूपाने आपल्याला आधुनिक काळातील ध्येयवेडी कर्मदुर्गा पाहायला मिळते. आदिशक्ती जगदंबेने रिया मॅडमना हे ज्ञानदानाचे आणि आत्मसन्मानाचे व्रत पुढे नेण्यासाठी अखंड बळ, उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावे. त्यांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास हजारो उपेक्षितांच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन यावा, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आभाळभर मानाचा मुजरा आणि मनःपूर्वक सदिच्छा!
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( ९८८१४७१६८४ )



