🔴 नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर 🔹 साक्षी घाडीगावकर : नेतृत्व, प्रतिभा आणि ज्ञानसंस्कारांची ‘तेजस्वी नवदुर्गा’!

0
11

शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ नऊ रात्रींचा उत्सव नव्हे, तर आपल्या अवतीभोवती अहोरात्र कार्यरत असणाऱ्या मातृशक्तीचा, तिच्यातील अथांग धैर्याचा, बहुआयामी प्रतिभेचा आणि त्यागाचा भक्तीभावपूर्ण जागर! आदिशक्तीचे एक रूप संहारक असले, तरी तिचे दुसरे रूप विद्या, कला, संगीत आणि नेतृत्वाचे वरदान देणाऱ्या साक्षात सरस्वतीचे असते. अशाच एका चौफेर कलागुणांनी संपन्न, विद्यार्थीप्रिय आणि ध्येयवादी ‘नवदुर्गे’चा गौरव करताना अंतःकरण अभिमानाने उचंबळून येते… त्या म्हणजेच सौ. साक्षी घाडीगावकर मॅडम (पूर्वाश्रमीच्या ममता रमेश चव्हाण)!
मुंबईच्या सांताक्रूझमध्ये जन्मलेल्या साक्षीताईंचे शालेय शिक्षण बांद्रा (ईस्ट) येथील नामांकित ‘अनुयोग विद्यालय’ येथे पहिली ते दहावीपर्यंत संपन्न झाले. त्यानंतर राजापूर हायस्कूलमधून अकरावी-बारावीचे शिक्षण घेताना, बारावीच्या परीक्षेत मराठी विषयात महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेची पहिली मोहोर उमटवली. राजापूर अध्यापक विद्यालयातून डी.एड. पूर्ण केल्यानंतर, आबासाहेब मराठे कॉलेज, हातिवले येथून त्यांनी पदवी शिक्षण घेतले. एफ.वाय. आर्ट्समध्ये संपूर्ण महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. केवळ अभ्यासातच नव्हे, तर नेतृत्वातही त्या सदैव अग्रणी राहिल्या; आधी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह (CR) आणि नंतर कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या महाविद्यालयीन कारकिर्दीतील सुवर्णक्षण म्हणजे, संपूर्ण मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून निवडल्या जाणाऱ्या अवघ्या १५ ‘युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह’ (UR) मध्ये त्यांची झालेली ऐतिहासिक निवड! त्यांच्या महाविद्यालयाच्या इतिहासात हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच विद्यार्थिनी ठरल्या.
साक्षीताई म्हणजे साक्षात चौसष्ट कलांचे वरदान लाभलेले व्यक्तिमत्त्व! समूहगायन, समूहनृत्य आणि वैयक्तिक नृत्यात त्यांनी पटकावलेले प्रथम व द्वितीय क्रमांक असोत; कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धांमधील त्यांचे गाजलेले यश असो; रांगोळी, मेहंदी, चित्रकला आणि हस्तकलेची आवड असो; किंवा विविध नाटिका, एकांकिका आणि एकपात्री प्रयोगांतील त्यांचा प्रभावी अभिनय असो—प्रत्येक मंचावर त्यांनी आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. संगीताची आंतरिक आवड जोपासताना त्यांनी हार्मोनियमच्या दोन परीक्षा अत्यंत जिद्दीने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या, ही त्यांच्या कलासाधनेची सुंदर साक्ष आहे.
अध्यापनाच्या पवित्र क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी हे सर्व कलागुण आणि नेतृत्व आपल्या विद्यार्थ्यांच्या ओंजळीत भरभरून ओतले. त्यांच्या सेवेची सुरुवात ‘गंगतीर्थ विद्यामंदिर उन्हाळे नं. १’ या शाळेतून झाली, जिथे त्यांनी तब्बल ११ वर्षे अविरत ज्ञानदानाचे व्रत सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने पंचतारांकित कवायतीत प्रथम क्रमांक मिळवला, तर समूहगायन व वैयक्तिक गायनात विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकावले. त्यानंतर ‘गोठणे दोनिवडे हातणकर वाडी नं. २’ येथे असताना त्यांनी इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिपसाठी विशेष मार्गदर्शन केले; त्यांच्या याच अभ्यासू वृत्तीमुळे जिल्हा स्तरावर शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका काढण्यासाठी सलग ३ वर्षे त्यांची निवड झाली होती.
२०१८ मध्ये जिल्हा बदली झाल्यानंतर हळवल नं. २ शाळेत अवघ्या दोन महिन्यांच्या वास्तव्यातही त्यांनी केंद्रस्तरावर कृतीयुक्त कविता गायनाचे सुंदर मार्गदर्शन केले. पुढे तळेरे नं. १ शाळेत दीड वर्षाच्या कालावधीत तालुकास्तरीय समूहनृत्यात द्वितीय क्रमांक मिळवून दिला आणि स्पर्धा परीक्षांचे मोलाचे मार्गदर्शन केले. सध्या कणकवली नं. १ शाळेत कार्यरत असतानाही तालुकास्तरीय समूहनृत्यात विद्यार्थ्यांचा यशस्वी सहभाग नोंदवत त्यांनी शाळेचे नाव सातत्याने उंचावले आहे. त्या ज्या शाळेत पाऊल ठेवतात, तिथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना बहर येतो आणि ज्ञानदानाचा सुगंध दरवळू लागतो.
घटस्थापनेच्या या पावन मंगलदिनी, मुंबईच्या विद्यापीठातील ऐतिहासिक नेतृत्वापासून ते ग्रामीण भागातील वर्गखोल्यांपर्यंत ज्ञानाचा आणि कलेचा नंदादीप अखंड तेवत ठेवणाऱ्या साक्षी घाडीगावकर यांच्या रूपाने आपल्याला आधुनिक काळातील तेजस्वी कर्मदुर्गेचे रूप पाहायला मिळते. आदिशक्ती जगदंबेने साक्षीताईंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि हीच अखंड ऊर्जा प्रदान करावी. त्यांच्या संस्कारांतून घडणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडो आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध अवघ्या महाराष्ट्रात असाच दरवळत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here