
वृत्तपत्र वाहक राजेंद्र चव्हाण यांचा होणार सन्मान; श्री रामेश्वर वाचन मंदिराचा उपक्रम
आचरा
माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त साजरा होणारा वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिन यांचे औचित्य साधून श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा यांच्या वतीने गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता दर्जेदार पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात देवगड व मालवण तालुक्यांचे वृत्तपत्र वाहक श्री. राजेंद्र यशवंत चव्हाण (रा. कनेडी) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि समाजात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार पुस्तकांची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच वृत्तपत्र वितरणाचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार करून त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला आचरा व परिसरातील वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री रामेश्वर वाचन मंदिराचे अध्यक्ष श्री. बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष श्री. अशोक कांबळी, कार्यवाह श्री. अर्जुन बापर्डेकर, सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सांस्कृतिक समिती सदस्य यांनी केले आहे.



