
शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ नऊ रात्रींचा उत्सव नव्हे, तर संकटांचे निखारे पायाखाली तुडवून, स्वतःचे अश्रू काळजातच दाबून ठेवत ज्ञानाचा नंदादीप अखंड तेवत ठेवणाऱ्या आदिशक्तीचा हृदयस्पर्शी जागर! जेव्हा गरिबी, उपेक्षा आणि दुःखाचे डोंगर एकाच वेळी समोर उभे ठाकतात, तेव्हा डगमगून न जाता स्वतःचे नशीब स्वतःच्या हातांनी घडवणारी माऊली म्हणजेच खरी दुर्गा. आज अशाच एका लढाऊ, सोशिक आणि माझ्या मनात कायम लहान बहिणीचे अढळ स्थान असणाऱ्या ‘नवदुर्गे’चा जीवनप्रवास मांडताना हात थरथरत आहेत आणि डोळे नकळत पाण्याने डबडबून येत आहेत… त्या म्हणजेच नवदुर्गा सौ. सीमा संजय वरुणकर!
कणकवली तालुक्यातील तळेरे हे त्यांचे जन्मगाव. पाच बहिणी आणि दोन भाऊ अशा अथांग पसऱ्यात पाचव्या क्रमांकावर सीमाताईंचा जन्म झाला. घरात आधीच दारिद्र्य आणि चार मुली; त्यामुळे पाचवी मुलगी जन्माला आल्यावर घरात साधा आनंदाचा लवलेशही नव्हता, चेहऱ्यावर स्वागत नव्हते. जन्माच्या क्षणापासूनच वाट्याला आलेली ही उपेक्षा त्यांनी मुकाट्याने सोसली. आर्थिक परिस्थिती आधी जेमतेम बरी होती, पण घरात घडलेल्या एका विचित्र घटनेने कुटुंबाचा पायाच पुरता ढासळला. परिस्थिती कमालीची हलाखीची झाली. तळेरे मराठी शाळा नं. १ मधून चौथी आणि वामनराव महाडिक विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मोठ्या जिद्दीने घेतले. दहावीत ६१.६०% गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावून गरिबीच्या अंधारात आपल्या तेजाची पहिली ठिणगी दाखवली!
दहावीनंतर शिक्षणाची वाट खुंटली होती; ‘पुढे काय करायचे?’ हा यक्षप्रश्न समोर असताना शेठ नवीनचंद मफतलाल विद्यालय खारेपाटणचे श्री. मठपती सर देवदूतासारखे घरी आले आणि त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा मार्ग दाखवला. घरात अन्नाची भ्रांत असताना कॉलेजचा खर्च कसा पेलणार? पण अशा वेळी त्यांच्या दोन थोरल्या बहिणी सीमाताईंच्या पाठीशी साक्षात माउली बनून उभ्या राहिल्या! त्या बहिणींनी स्वतःच्या हाताचे पाळणे केले, लोकांचे टेलरिंग काम केले, सुई-दोरा हातात धरून हातशिलाई केली, दिवस-रात्र साड्यांना फॉल-पिको करून पैसे जमवले आणि आपल्या धाकट्या बहिणीला शिकवले!
पण नियतीची क्रूरता इथेच संपली नव्हती… बारावी सायन्सची बोर्डाची परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली होती, आणि घरात दुःखाचा आभाळ कोसळला—लाडक्या वडिलांचे अचानक छत्र हरपले! ज्या वयात बापाच्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे, घरात बापाचे प्रेत समोर असताना आणि काळजाची चिरफाड होत असताना, त्या थोरल्या बहिणींनी डोळ्यांतील अश्रू पुसून सीमाताईंना धीर दिला, “तू परीक्षा दे, बापाचे स्वप्न पूर्ण कर!” त्या आकांतात, अश्रूंच्या महापुरात सीमाताईंनी बारावी सायन्सची परीक्षा दिली आणि ६०.५०% गुण मिळवून ती उत्तीर्ण केली!
पुढे बहिणींच्या आग्रहास्तव कणकवलीच्या कै. सौ. इंगेट्राऊट नाईक डी.टी.एड. विद्यालयात प्रवेश घेतला. त्या दोन वर्षांत दोन्ही बहिणींची लग्ने झाली; पण सासरी जातानाही त्या बहिणींनी आपल्या धाकट्या बहिणीच्या दोन वर्षांच्या डी.एड.च्या फीची आणि खर्चाची सोय आधीच बाजूला काढून ठेवली होती! रक्ताच्या नात्यात असा निस्वार्थ त्याग आणि मायेचा पाझर कुठे पाहायला मिळेल? २००१ मध्ये डी.एड. पूर्ण झाले, पण नोकरी लगेच मिळाली नाही. कित्येक वर्षे नोकरीसाठी वणवण भटकंती झाली. दिवस काढायचे म्हणून सीमाताईंनी स्वतः मुलांचे शिकवणी वर्ग घेतले, शिलाई केली, काज-बटणे लावली, कपड्यांना फॉल लावून चरितार्थ चालवला.
अखेर २००८ च्या परीक्षेत त्यांचा नंबर लागला आणि ५ मार्च २००९ रोजी ‘साळिस्ते नं. १’ शाळेत शिक्षण सेवक म्हणून त्या रुजू झाल्या. ७ मे २०१९ रोजी प्रशासकीय बदलीने त्या ‘जि. प. शाळा शिडवणे नं. १’ येथे आल्या. तिथे आदरणीय तांबे सर ( पूर्वीचे मुख्याध्यापक ) , सौ. सुजाता कुडतरकर आणि मुख्याध्यापक म्हणून माझी व त्यांची भेट झाली. सुरुवातीला त्या प्रचंड धास्तावलेल्या होत्या, पण शिडवणे नं. १ मध्ये त्यांना एक शाळा नव्हे, तर माहेरचे घर मिळाले. मी त्यांना नेहमीच एका सहकाऱ्यापेक्षा लहान बहिणीप्रमाणे जपले, मार्गदर्शन केले आणि त्यांनीही एका धाकट्या बहिणीच्या आदराने शाळेची धुरा सांभाळली. शिडवणे नं. १ शाळेचा खो-खो खेळातील जिल्ह्यावरील दबदबा आजही कायम आहे, त्यात सीमाताईंचे योगदान अमूल्य आहे. शिडवणे शाळेत असताना त्यांना सलग तीन वर्षे उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार आणि प्रतिष्ठेचा केंद्रस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारही प्राप्त झाला. पुढे ८ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची बदली ‘शिडवणे कोनेवाडी’ शाळेत झाली आणि गेल्या वर्षभरापासून त्या तिथेही ज्ञानाचा मळा अत्यंत निष्ठेने फुलवत आहेत. बी.ए. (राज्यशास्त्र) आणि डी.एड. अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या सीमाताई आज आत्मविश्वासाने नव्या पिढीला घडवत आहेत.
जन्मतः मिळालेली उपेक्षा, बहिणींनी रात्रंदिवस सुई-दोऱ्याने शिवलेले आयुष्य, बापाचे सरण समोर असताना दिलेली बोर्डाची परीक्षा, आणि हाताला काज-बटणे लावण्यापासून ते आदर्श शिक्षिका बनण्यापर्यंतचा हा थरारक प्रवास… हा इतिहास आठवला की सीमाताई, आज तुमचेच काय, तर वाचणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. बहिणींच्या त्या त्यागाचे, बापाच्या त्या आशीर्वादाचे आणि तुमच्या या अफाट संयमाचे आज चीज झाले आहे!
घटस्थापनेच्या या पावन क्षणी, संकटांच्या वादळांना शांत करून ज्ञानमंदिरात दीपस्तंभ बनलेल्या माझ्या या लाडक्या बहिणीला, नवदुर्गेला मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने सीमाताईंना उदंड, निरोगी आयुष्य, अखंड सुख आणि आत्मिक समाधान द्यावे. तुमच्या डोळ्यांतील अश्रूंची जागा कायम यशाच्या हसूने घ्यावी, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एका मोठ्या भावाकडून काळजातून आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा आणि शुभाशीर्वाद!
©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*
( ९८८१४७१६८४ )



