
तळेरे : शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देणारे प्रशालेचे संस्थापक वामनराव महाडिक उर्फ आप्पा यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाला जमिन देणगीदार सुभाष शांताराम महाडिक आणि जयशंकर चिंतामणी ढेकणे यांची उपस्थिती होती.शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी प्रास्ताविकात आप्पांच्या शैक्षणिक योगदानाची माहिती देत त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याचा विस्तार स्पष्ट केला. आप्पांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, त्यांच्या दूरदृष्टीचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात शरद वायंगणकर यांनी आप्पांच्या कार्याचा गौरव केला.त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
प्राध्यापक सचिन शेटये यांनी सूत्रसंचालन केले.बारावीची विद्यार्थिनी मयुरी तळेकर हिने आभार मानले.यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



