
तळेरेत विद्युत वाहिनी धोकादायक स्थितीत; दुरुस्तीचे काम अर्धवट
उपसरपंच संदीप घाडी यांची तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी
तळेरे, दि.२०
तळेरे येथील श्री गांगेश्वर मंदिर तसेच घाडीवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर वसंत तोंडवलकर यांच्या घराशेजारी विद्युत वाहिनी धोकादायकरीत्या लोंबकळत आहे. या वाहिनीचा नागरिकांशी संपर्क आल्यास दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने उपसरपंच संदीप घाडी यांनी महावितरणच्या तळेरे उपअभियंत्यांना दि.०६/०९/२०२६ रोजी लेखी पत्र देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
पत्राची दखल घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरू केले; मात्र ते पूर्ण न करताच थांबविण्यात आल्याने विद्युत वाहिन्या अद्याप धोकादायक स्थितीत आहेत. याबाबत घाडी यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, आवश्यक साहित्य कार्यालयात उपलब्ध नसून वरिष्ठांकडून मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने साहित्याची प्रतीक्षा न करता आवश्यक व्यवस्था करून दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी ठाम मागणी उपसरपंच संदीप घाडी यांनी केली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे.



