मोडीलिपी प्रशिक्षण वर्गातून इतिहासाचे संवर्धन- एस.डी. वाडकर

0
78

मोडीलिपी प्रशिक्षण वर्गातून इतिहासाचे संवर्धन- एस.डी. वाडकर

वैभववाडी, दि.२७ नोव्हेंबर 

महाराष्ट्र शासनाचा पुराभिलेख संचालनालय हे मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करीत आहे. मोडी लिपीची ओळख व तीचे संवर्धन व्हावे यासाठी वैभववाडी सारख्या ग्रामीण भागात या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मोडी लिपी प्रशिक्षणातून आपल्या इतिहासाचे संवर्धन होण्यास हातभार लागणार आहे असे संशोधक सहाय्यक श्री.एस.डी वाडकर यांनी सांगितले.

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, संस्थेचे विश्वस्त शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे, सतीश रावराणे, संशोधक सहाय्यक विनायक पाटील, निलेश खारकर, उपप्राचार्य डॉ.माणिक चौगुले, इतिहास विभाग प्रमुख व समन्वयक प्रा.सुरेश पाटील व सहाय्यक समन्वयक डॉ.किरण पाटील उपस्थित होते.

श्री.एस.डी.वाडकर यांनी मोडी लिपी व तीचा इतिहास याबद्दल सविस्तर माहिती दिली.

मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून संस्थेने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून सहभागींना व या प्रशिक्षण वर्गाला विश्वस्त शरदचंद्र रावराणे यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व सहभागी व्यक्तींनी हे प्रशिक्षण पूर्ण करून चांगले यश प्राप्त करावे असे आवाहन स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी केले.

जुन्या काळातील कागदपत्रे ही प्रामुख्याने मोडी लिपीतील असून त्याचे वाचन करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून हे वाचन शक्य होणार आहे. इतिहासाचा उलघडा करताना उपजीविकेचे साधन म्हणून याचा उपयोग होणार आहे असे वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी सांगितले.

उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणा प्रतापसिंह आणि आनंदीबाई रावराणे प्रतीमा पूजन व दीप प्रज्वलन करून मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यामागील उद्देश प्रा.सुरेश पाटील यांनी प्रस्तावनेतून विशद केला. या कार्यक्रमाला सहभागी व्यक्ती, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.माणिक चौगुले यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here