हायकोटायो …

0
8

आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला कितीतरी माणसं भेटत राहतात. काहींचा सहवास ओझरता असतो, तर काहींचं जगणं आपल्या मनावर असा काही अमीट ठसा उमटवून जातं की आपण नकळत त्यांचे अनेक गुण आत्मसात करून बसतो. या माणसांभोवती एक वेगळंच भारदस्त आणि चैतन्यमय वलय असतं. त्यांच्या नुसत्या वावरण्यानेही वातावरणात एक अदृश्य वजन जाणवत राहतं. हे वजन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक आदरयुक्त दरारा असतो. त्यांच्याशी बोलतानाही शब्दांची निवड जपून करावी लागते; त्यांच्या धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाला नकळत आपण मनातून वंदन करत असतो. अभिनयाची एक चालतीबोलती कार्यशाळा असलेलं असंच एक तळपणारं व्यक्तिमत्त्व मला अगदी जवळून अनुभवता आलं, याचा मनात आजही एक कृतज्ञ आनंद आहे.
उत्कृष्ट नाट्यकृती साकारणं आणि रंगमंचावर अक्षरशः जीव ओतणं ही त्यांची सहज खासियत! शब्दांची धारदार फेक आणि निर्जीव शब्दांनाही रसरशीत सजीवता देण्याची त्यांची ताकद मी अगदी लहानपणापासून अचंबित होऊन पाहत आलोय. एका कसलेल्या, हाडाच्या अभिनेत्याचं हे सार्थ वर्णन ज्यांना तंतोतंत लागू पडतं, ते ज्येष्ठ रंगकर्मी म्हणजे सुहास वरुणकर!
एसटी महामंडळात लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्यातील जन्मतः असलेला नाटककार त्यांना कधीच शांत बसू देत नव्हता. कॉलेजचे दिवस तर त्यांनी अक्षरशः गाजवून सोडले होते. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अख्ख्या सभागृहाला खुर्चीला खिळवून ठेवण्याची किमया फक्त त्यांच्याच हातात होती. त्यांचे प्रयोग नेहमी शेवटी ठेवले जायचे; कारण वरुणकरांचा परफॉर्मन्स पाहिल्याशिवाय कॉलेजचे तरुण-तरुणी जागेवरून पाय काढायला तयार नसत.
मी तेव्हा आठवी-नववीत शिकत असेन. माझी मोठी ताई कणकवली कॉलेजमध्ये शिकत होती. तिच्या बोटाला धरून मी त्या गॅदरिंगची गंमत पाहायला गेलो होतो. तो सोनेरी काळ, तो कॉलेजचा अल्लड उत्साह आणि अचानक स्टेजवर झालेली सुहास वरुणकरांची एन्ट्री! संपूर्ण सभागृह टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गगनभेदी आवाजाने दणाणून गेलं. मीही भारावून जाऊन फक्त टाळ्या वाजवत होतो. बाकीच्या मुलांसारखी शिट्टी वाजवण्याचा मीही केविलवाणा प्रयत्न करून पाहिला खरा, पण ओठांतून फक्त गार वारा बाहेर पडला; आवाज काही फुटला नाही! (अजूनही मला शिट्टी वाजवता येत नाही, म्हणूनच मी कधी त्या भानगडीत पडत नाही म्हणा!)
रंगमंचावर वरुणकर एका विलक्षण अंदाजात अवतरले होते. हातात आडवी धरलेली काठी, पोटावरचा तोल सांभाळत चालण्याची त्यांची ती लकब आणि ओठांवर एक अजब लयीत चाललेलं गाणं— “हायकोटायो नादे खोटा, हायकोटायो नादे खोटा…” त्यावेळीही मला त्या शब्दांचा नेमका अर्थ उमगला नव्हता आणि आज इतक्या वर्षांनंतरही लागलेला नाही. कदाचित तो गूढ अर्थ फक्त त्यांनाच ठाऊक असावा; पण त्या एका लकेरीने आणि चालीने संपूर्ण हॉलवर जी मोहिनी घातली होती, ती आजही माझ्या डोळ्यांसमोर लख्ख उभी राहते.
हेच सुहास वरुणकर आमच्या सलूनचे नेहमीचे ग्राहक. मीही त्यांचे एकदोनदा केस कापले आणि रंगवले आहेत. खरं सांगायचं तर, वरुणकरांचे केस कापणे म्हणजे एका कसलेल्या परीक्षेतून जाण्यासारखं असायचं! त्यांना हवी तशीच आणि ते सांगतील तितकीच कातर चालवायची. किंचितही कसूर झाली, तर समोरच्याची खैर नसायची. पण माझ्या पूज्य बाबांना त्यांच्या केसांचं आणि स्वभावाचं नेमकेपण चांगलं ठाऊक होतं. बाबांच्या हाताखाली बसल्यावर सुहासजी क्वचितच काही त्रुटी काढायचे. एवढा मोठा रंगमंचाचा बादशहा आपल्या दुकानात येऊन बसतोय, याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटे. ते नेहमीच भरभर पावलं टाकत, एका ठसक्यात प्रवेश करायचे आणि केस कापून झाल्यावर तितक्याच ताकदीने निघून जायचे; जणू रंगमंचावर एक दमदार प्रवेश करून ते एक्झिट घेत आहेत!
एकदा सहजच त्यांच्या जुन्या घरी गेलो होतो, तर हा कलावंत निवांतपणे कोणाच्या तरी रिक्षाची सीट बनवून देण्यात गढून गेला होता. कलेच्या शिखरावर असलेला माणूस हातांच्या श्रमांशी किती सहज जोडलेला असतो, याचं ते बोलकं रूप होतं.
नाथ पै एकांकिका स्पर्धा असो, यंगस्टार मित्रमंडळ, अक्षरसिंधू कलामंच, कामगार कल्याण केंद्र, बागेश्री थिएटर की एसटी कामगार नाट्यस्पर्धा— त्यांनी पाय ठेवला नाही आणि जिंकला नाही असा रंगमंच कोकणात विरळाच! त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच मोहिनी आणि दबदबा असायचा. ‘तन माजोरी’ या नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका सहकलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या काळजात आजही कोरलेली आहे. ‘किरवंत’, ‘आमुषा’ यांसारख्या सामाजिक भान देणाऱ्या आणि हादरवून टाकणाऱ्या नाटकांतून त्यांनी आपली अभिनयशैली सिद्ध केली. पुढे त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आणि अनेक एकांकिका, नाटकांना जिवंत केलं. राज्यस्तरावरील पुरस्कारांवर त्यांनी नेहमीच आपल्या नावाची मुद्रा उमटवली.
काळाच्या ओघात आज ते युट्यूबवरच्या विनोदी प्रहसनांमधून नव्या पिढीलाही तितकंच खळखळून हसवत आहेत. कणकवलीच्या नाट्यविश्वाचा इतिहास लिहायचा झाला, तर सुहास वरुणकर या नावाशिवाय तो कधीही पूर्ण होऊ शकत नाही.
एका नाटकातील भूमिकेच्या पूर्णत्वासाठी त्यांनी आपली अत्यंत प्रिय असलेली मिशी आणि डोक्यावरचे केस क्षणाचाही विचार न करता उतरवले होते. त्या रूपात त्यांना ओळखणंही कठीण झालं होतं. भूमिकेसाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावणारा असा निष्ठावंत कलावंत पाहिला की नतमस्तक व्हायला होतं. अशा ध्यास आणि समर्पणाने भरलेल्या रंगकर्मीच्या सहवासाचे काही सोनेरी क्षण मला अनुभवता आले, हे माझ्याही आयुष्यातील एक सुंदर आणि समृद्ध ‘नाट्य’च म्हणावे लागेल!

©️ प्रवीण अशितोष कुबल
(९८८१४७१६८४)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here