
सावंतवाडी / प्रतिनिधी: दि.१२ ऑक्टो.२०२६
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून ‘वाईल्ड कोकण, सावंतवाडी’ या संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या उपक्रमात एकूण १७ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली असून ३४ पक्षीमित्रांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला.
सकाळी ७ ते ९:३० या वेळेत हे पक्षी निरीक्षण करण्यात आले. या दरम्यान पांढऱ्या पोटाचा समुद्र गरुड, सोनेरी रंगाचा हळद्या, पिवळ्या कंठाची चिमणी (सलीम अली स्पॅरो), ब्रॉन्झ ड्रोंगो (कोतवाल), ॲशी ड्रोंगो, येलो ब्रॉड बुलबुल, ब्राऊन चिक फुलवेटा, व्हाईट थ्रॉटेड किंगफिशर, क्रिमसन बॅक सनबर्ड, ग्रे हेडेड बुलबुल, भारद्वाज, लाल गालाचा शिपाई बुलबुल, काळ्या टोपाचा हळद्या, मलाबार फ्लेम बॅक, हार्ट-स्पॉटेड वूडपेकर, ऑरेंज मिनिव्हेट आणि स्मॉल मिनिव्हेट यांसारख्या विविध पक्षी प्रजातींची नोंद पक्षी मित्रांनी केली.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची पक्षीमित्र म्हणून विशेष उपस्थिती लाभली. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती व अधिवासाचा उल्लेख नेहमीच वन्यजीव अभ्यासक आवर्जून करतात. मला या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होता आले, याचा आनंद आहे.”
तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “सिंधुदुर्गाच्या निसर्गरम्य परिसरात विविध वन्यजीव आढळतात. त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.”
या पक्षी निरीक्षण उपक्रमात वाईल्ड कोकण संस्थेचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव डॉ. गणेश मर्गज, निवृत्त वन अधिकारी सुभाष पुराणिक, रवींद्र ओगले, अनंत बडे, नंदन बिरोडकर, रविकांत चिटणीस, सिद्धेश नाईक, ओमकार गावकर, प्रज्ञा गावकर, चैतन्य अडवलकर, वनश्री दोडामार्गचे अनुराग सिनारी, तुषार देसाई, पक्षीतज्ज्ञ प्रवीण सातोसकर, अश्वेक गवस, सुरज गावडे, ओमकार गावडे, रोहित परब, तन्वी वैद्य, वनशक्ती मालवणचे यथार्थ खवणेकर, जानकी राऊळ, पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. अतुल बोंद्रे, नवसो परब, ऋषिकेश सावंत, मनाली पारसेकर, कृपा परब, अथर्व बोंद्रे, श्लोक सावंत आदी मान्यवर व पक्षीप्रेमी उपस्थित होते.
भविष्यातही अशा प्रकारे पक्षीमित्रांना एकत्र आणून विविध निसर्गपूरक उपक्रम राबवणार असल्याचे वाईल्ड कोकण संस्थेचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर व सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी स्पष्ट केले.





