
शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ नऊ रात्रींचा उत्सव नव्हे, तर आपल्या अवतीभोवती अखंड तेवणाऱ्या स्त्रीशक्तीचा, तिच्यातील सृजनशीलतेचा आणि त्यागाचा भक्तीभावपूर्ण जागर! आदिशक्तीचे एक रूप संहारक असले, तरी तिचे दुसरे रूप मायेची उब देणारे, अज्ञानाचा अंधकार दूर सारणारे आणि समाजाला सन्मार्गाची दिशा दाखवणारे असते. अशाच एका कार्यतत्पर, समर्पित ‘नवदुर्गे’चा गौरव करण्याचे भाग्य या नवरात्र पर्वात लाभले आहे… त्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माजी तालुकाध्यक्षा, माजी तालुका महिला सचिव आणि ज्ञानदानाचे अविरत व्रत जोपासणाऱ्या शिक्षक भगिनी नेहा मोरे!
शैक्षणिक आणि सामाजिक पटलावर स्वतःच्या कर्तृत्वाचा नंदादीप अहोरात्र तेवत ठेवणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांना जेव्हा एखादा सन्मान लाभतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या पुरस्काराचीच प्रतिष्ठा वाढते. परफेक्ट अकॅडमीच्या वतीने प्रदान करण्यात आलेला मानाचा ‘आचार्य शिरोमणी पुरस्कार’ मार्च २०२२ मध्ये नेहा मोरे मॅडम यांना प्राप्त झाला आणि त्यांच्या शैक्षणिक योगदानावर मानाचा तुरा रोवला गेला. आजची कोवळी पिढी सुसंस्कृत, संस्कारक्षम आणि संवेदनशील घडावी म्हणून अविरत झटणाऱ्या शिक्षकांमध्ये त्या अग्रस्थानी आहेत. काही माणसे इतकी स्वयंप्रकाशी असतात की त्यांच्या केवळ सहवासानेच जीवनाचे सोने व्हावे; अडचणींवर मात करत, संघर्षाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघालेले नेहाताईंचे व्यक्तिमत्त्व प्रत्येकाला जगण्याची आणि लढण्याची नवी उमेद देते. स्वतःच्या समस्या बाजूला ठेवून विद्यार्थ्यांसाठी आणि संघटनेसाठी धावून जाणारी ही खरीखुरी ‘कर्मदुर्गा’ आहे.
सध्या कणकवली तालुक्यातील ‘जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आशिये’ येथे त्या उपशिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. शाळेत मायेची सावली धरून चिमुकल्यांच्या मनात ज्ञानाचा उजेड पेरणे असो, की यापूर्वी शिक्षक समितीच्या माजी तालुकाध्यक्षा तसेच माजी तालुका महिला सचिव म्हणून संघटनेची धुरा अत्यंत लीलया आणि समर्थपणे पेलणे असो—प्रत्येक आघाडीवर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. विशेषतः तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी केलेले संघटनात्मक कार्य अत्यंत वाखाणण्याजोगे ठरले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी, महिला आघाडीचे सक्षम संघटन आणि त्यांचे ते शांत पण कणखर नेतृत्व समोरच्याला सहज आपलेसे करायचे. पदे येतात आणि जातात, पण त्यांनी त्या पदांना दिलेली प्रतिष्ठा आणि त्या कार्यातील आंतरिक आत्मीयता आजही सर्वांच्या स्मरणात ताजी आहे.
अशा ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्वाला पाहताना मला माझ्या शालेय जीवनातील गुरुजनांची अनाहूतपणे आठवण होते. शिक्षक समिती ही मुळातच माणसे घडवणारी समृद्ध पाठशाळा आहे. कणकवली नं. ३ शाळेत शिकत असताना पूज्य रॉड्रिग्ज गुरुजींनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप, परिपाठातील त्यांचे संस्कार आणि मला त्यांनी प्रेमाने दिलेली ‘स्कॉलर’ ही उपाधी आजही माझ्या स्मरणात जिवंत आहे. त्यांच्या त्या एका शब्दाने माझ्या आयुष्याला दिशा दिली. ती केवळ माझी मेहनत नव्हती, तर आमचे तत्कालीन आचार्य शिरोमणी पाटकरगुरुजी, नारकरगुरुजी, पालवगुरुजी, परबगुरुजी आणि तावडेबाई यांच्या पुण्याईची शिदोरी होती.
आज आमची ही समिती म्हणजे अभिमानाची समृद्ध खाण आहे; यात अनेक हिरे आणि झाकलेली माणके प्रसंगानुरूप आपल्या तेजाने चमकताना दिसतात. नेहा मोरे मॅडमसारखी ही शिक्षक रत्ने जेव्हा समाजात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने आदराचे स्थान मिळवतात, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. नेहाताईंना मार्च २०२२ मध्ये प्राप्त झालेला हा ‘आचार्य शिरोमणी’ सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, ग्रामीण भागातील मुलांसाठी अहोरात्र झटणाऱ्या अवघ्या शिक्षक वर्गाचा आणि कणकवली शाखेच्या मातृशक्तीचा गौरव आहे.
घटस्थापनेच्या या पावन क्षणी, आदिशक्ती जगदंबेने नेहाताईंच्या कार्यकुशल हातांना अशीच अखंड ऊर्जा द्यावी. त्यांच्या वाटचालीतून कित्येक पिढ्या सुसंस्कृत घडाव्यात आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या हृदयातील कायमचे ‘आचार्य शिरोमणी’ स्थान अढळ ठेवावे, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( ९८८१४७१६८४ )



