🔴 नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर  🔹 वेदिका विनोद चव्हाण : अथांग दुःख, अढळ जिद्द आणि शौर्याची ‘रणरागिणी नवदुर्गा’!

0
78

🔴 *नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर*

🔹 *वेदिका विनोद चव्हाण : अथांग दुःख, अढळ जिद्द आणि शौर्याची ‘रणरागिणी नवदुर्गा’!*

शारदीय नवरात्राची मंगलमय घटस्थापना म्हणजे केवळ घट मांडून केलेली पूजा नव्हे, तर आपल्या अवतीभोवती संकटांच्या वादळांना छातीवर झेलत स्वतःचे आयुष्य इतरांसाठी चंदनासारखे झिजवणाऱ्या आदिशक्तीचा, तिच्यातील अथांग सोशिकतेचा, पराक्रमाचा आणि त्यागाचा अश्रुपूर्ण जागर! नियतीने कितीही कठोर परीक्षा घेतली, तरी पाय डगमगू न देता ताठ कण्याने उभी राहणारी, दुःखाचे घोट पचवून चेहऱ्यावर वात्सल्याचे हसू फुलवणारी आणि संकटांशी भिडताना वाघिणीचे रूप घेणारी माऊली म्हणजेच खरी दुर्गा. अशाच एका वादळांशी दोन हात करत उभ्या राहिलेल्या, कर्तृत्ववान आणि क्रीडारंग गाजवणाऱ्या ‘नवदुर्गे’चा गौरव करताना आज डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत… त्या म्हणजेच नवदुर्गा सौ. वेदिका विनोद चव्हाण (पूर्वाश्रमीच्या गीता जानबा जाधव)!

लहानपणापासूनच घरात मुला-मुलीचा भेद कधीच नव्हता; “तू आमची मुलगी नाहीस, तर आमचा मुलगा आहेस!” ही आई-वडिलांची माया आणि पाठीवर पडलेली प्रेमाची थाप त्यांना लहानपणापासूनच धाडसी बनवून गेली. पोहणे असो, वेगवेगळ्या गाड्या चालवणे असो, खेळ, नृत्य की अभ्यास… जे हात लावेल त्यात सर्वोत्तमच व्हायचे, ही अदम्य जिद्द बालपणीच त्यांच्या नसानसांत भिनली होती. कोलगाव माध्यमिक विद्यालयातून दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सावंतवाडीच्या एस.पी.के. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पंधरावीला (बी.ए.) संपूर्ण मराठी विभागातून महाविद्यालयात प्रथम क्रमांक, डी.एड.च्या दोन्ही वर्षांत प्रथम क्रमांक, आणि पुढे बी.एड.च्या अंतिम वर्षातही कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक! एम.ए., बी.एड. पर्यंतची ही शैक्षणिक भरारी त्यांच्यातील प्रगल्भ गुणवत्तेची साक्ष देते.

खेळाची मनापासून आवड असल्यामुळे अंगात खाकी वर्दी परिधान करून ‘पोलीस’ व्हावे, देशसेवा करावी, हे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते. पण वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी नोकरीचा कॉल आला आणि दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल (आई केंद्र) या दुर्गम भागातून ज्ञानदानाचा पवित्र प्रवास सुरू झाला. स्वतः पोलीस होता आले नाही तरी, नियतीने त्यांच्या त्या स्वप्नाला त्यांच्या पतीदेवांच्या रूपाने पूर्ण केले! सावंतवाडी मळगाव केंद्रातील सावळवाडा शाळेत तब्बल १० वर्षे त्यांनी सेवा केली. त्यानंतर कणकवली तालुक्यातील वागदे डंगळवाडी येथे ६ वर्षे ज्ञानदानाचे नंदादीप तेवत ठेवल्यानंतर, पुढे त्या शिडवणे नं. १ या शाळेत रुजू झाल्या.

मैदानावर पाऊल ठेवले की या माऊलीच्या अंगात साक्षात चंडीचे रूप संचारायचे! जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेत सावंतवाडी तालुक्याच्या महिला कबड्डी संघाची धुरा कर्णधार म्हणून सांभाळताना सलग विजेतेपद आणि तालुक्याला चॅम्पियनशिप मिळवून देण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवला. कणकवली तालुक्यात आल्यानंतर तर तब्बल १०-१५ वर्षांचा दुष्काळ संपवत, कणकवलीच्या महिला कबड्डी संघाला जिल्ह्याचे अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या लढाऊ कर्णधार त्या ठरल्या! दुसऱ्याच वर्षी कणकवली तालुक्यातील शिक्षकांचे नृत्य बसवून संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून देण्याचे कसबही त्यांनी लिलया दाखवले.

संसार, नोकरी आणि मैदानावरील हा लढा सुरू असताना, ज्या आई-वडिलांनी त्यांना हाताचे पाळणे करून मुलगा मानून घडवले, आणि ज्या जीवनसाथीने प्रत्येक संकटात ढाल बनून साथ दिली, त्यांच्या विश्वासावर त्या प्रत्येक वादळ पेलत राहिल्या. पण २०२१ च्या त्या काळरात्री नियतीने एक असा घाव घातला, ज्याची कळ आजही काळजाला घरे पाडते… ज्या बापाच्या खांद्यावर हात ठेवून जग जिंकायला निघाली होती, त्या लाडक्या वडिलांचे कोरोनाच्या क्रूर लाटेत अचानक छत्र हरपले! तो आकांत, तो बापाचा सुटलेला हात आठवला की आजही कंठ दाटून येतो आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आयुष्यात कधीही भरून न येणारे हे दुःख छातीत दाबून, आपल्या दोन मुलांच्या डोळ्यांत स्वप्ने फुलवत त्या पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहिल्या. आज त्यांची दोन्ही मुलेही आईसारखीच खेळ, कला आणि अभ्यासात आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवत आहेत.

वाचन, नृत्य, खेळाची आवड आणि फोर-व्हीलर चालवत नवनवीन वाटा धुंडाळण्याची त्यांची जिद्द आजही एका तरुण रणरागिणीला लाजवेल अशीच आहे. त्यांच्या या तब्बल २३ वर्षांच्या अखंड ज्ञानदानाच्या तपश्चर्येची दखल घेत गोवा शासनामार्फत त्यांना मानाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे; तसेच डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा संस्थेमार्फत बारामतीचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊनही त्यांच्या गुणवत्तेवर सन्मानाची मोहोर उमटवण्यात आली आहे.

“माझ्या आयुष्यातील बरीच वैयक्तिक स्वप्ने मी पूर्ण केली आहेत, पण आता माझ्या डोळ्यांसमोर केवळ माझी लाडकी मुले आहेत! या विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवून, स्पर्धा परीक्षा असो वा इतर कोणतेही क्षेत्र, त्यांचे नाव जगभरात मोठे करायचे आहे आणि माझ्या शाळेचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचवायचा आहे,” ही त्यांची आंतरिक तळमळ एका खऱ्या शिक्षकी माउलीच्या हृदयाची साक्ष देते. दुःखाच्या महासागरावर मात करत स्वतःचे संपूर्ण अस्तित्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी समर्पित करणारी ही शिक्षिका साक्षात संकटांवर मात करणारी कर्मदुर्गा वाटते.

घटस्थापनेच्या या पावन मंगलदिनी, वडिलांच्या आठवणींच्या अश्रूंना स्मरून, संकटांशी झुंजणाऱ्या या रणरागिणीच्या चरणी मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने वेदिकाताईंना विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे अखंड बळ द्यावे, त्यांच्या कुटुंबाला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचा हा लढाऊ व ज्ञानमय बाणा भावी पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!

 

©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*

( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here