🔴 *नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर*  *मयुरी हेमंत राणे : अखंड साधना, वात्सल्य आणि ज्ञानयज्ञाची ‘विद्यादुर्गा’!*

0
54

🔴 *नवदुर्गा विशेष : आदिशक्तीचा जागर*

🔹 *मयुरी हेमंत राणे : अखंड साधना, वात्सल्य आणि ज्ञानयज्ञाची ‘विद्यादुर्गा’!

शारदीय नवरात्राची पावन घटस्थापना म्हणजे केवळ पारंपरिक उत्सवाचा सोहळा नव्हे, तर आपल्या अवतीभोवती स्वतःचे आयुष्य निस्वार्थपणे चंदनासारखे झिजवणाऱ्या, ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या नशिबाची रेषा बदलणाऱ्या आदिशक्तीचा, तिच्यातील अथांग सोशिकतेचा आणि त्यागाचा अश्रुपूर्ण जागर! संकटांच्या खडतर वाटांवरून चालताना अंगात अपार संयम ठेवून, स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच परक्यांच्या लेकरांना स्वतःचे मानून त्यांच्या अंधारमय आयुष्यात ज्ञानाची ज्योत पेटवणारी माऊली म्हणजेच खरी दुर्गा. अशाच एका समर्पित, ध्येयवेड्या आणि ज्ञानतपश्चर्येत स्वतःला झोकून देणाऱ्या ‘नवदुर्गे’चा गौरव करताना आज डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत… त्या म्हणजेच नवदुर्गा सौ. मयुरी हेमंत राणे (पूर्वाश्रमीच्या सरीता विजयसिंग तावडे)!

कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य आणि संस्कारसंपन्न ‘पोखरण’ हे त्यांचे माहेरचे गाव. तावडे घराण्यातील सुसंस्कृत वातावरणात आणि आई-वडिलांच्या प्रेमाच्या छायेत त्यांचे बालपण घडले. मातीशी नाळ जोडून लहानाची मोठी होत असतानाच मनात एक उदात्त ध्यास होता—समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याचा!

२५ नोव्हेंबर २००२ रोजी कुडाळ तालुक्यातील ‘कुपवडे नं. १’ या शाळेतून एका तरुण शिक्षिकेने ज्ञानदानाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. शिक्षण सेवक पदाचा तो तुटपुंजा मानधन आणि सुरुवातीचा खडतर काळ; पण मनात मात्र ग्रामीण भागातील लेकरांचे भविष्य घडवण्याची अथांग तळमळ होती. त्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा असा ठसा उमटवला की, इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्तीचा निकाल १००% लावून एका विद्यार्थ्याला थेट शिष्यवृत्तीधारक बनवले! त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानी मी होणार’ चा संघ जिल्हास्तरापर्यंत धडकला. स्वतःच्या सेवेच्या अगदी सुरुवातीपासूनच प्रभाग स्तरावर विविध शिक्षक प्रशिक्षणांमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करत त्यांनी आपल्या प्रगल्भ अभ्यासूपणाची चुणूक दाखवली.

जून २००६ मध्ये त्या कणकवली तालुक्यातील ‘नवीन कुर्ली वसाहत’ या शाळेत दाखल झाल्या आणि सलग आठ वर्षे त्यांनी त्या वसाहतीतील मुलांसाठी स्वतःला वाहून घेतले. गरिबी, अज्ञान आणि कौटुंबिक अडचणींमुळे शाळेची पायरी न चढणाऱ्या, भटकणाऱ्या लेकरांच्या घरोघरी जाऊन, पालकांची मनधरणी करून त्यांनी मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले. ज्या हातांत दगड-माती होती, त्या हातात पाटी-पेन्सिल देऊन शिक्षणाची गोडी लावली. इयत्ता सातवीचा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवला आणि क्रीडांगणावर वसाहतीतील लेकरांना जिल्हास्तरापर्यंत झेप घ्यायला लावली. हे करत असताना स्वतःची शिक्षणाची भूक शमली नाही; संसाराचा गाडा हाकत २००५ मध्ये बी.ए., २००७ मध्ये एम.ए. आणि २०१० मध्ये डी.एस.एम. पदवी पूर्ण करून स्वतःला सातत्याने समृद्ध केले.

पुढे जून २०१४ ते मे २०१९ या काळात करुळ (ता. कणकवली) शाळेत चिमुकल्यांच्या मनात आत्मविश्वासाचे बीज रोवणारे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यानंतर मे २०१९ मध्ये देवगड तालुक्यातील ‘रेंबवली’ या दुर्गम शाळेत त्यांची नियुक्ती झाली. तिथे घालवलेली पाच वर्षे म्हणजे एका शिक्षिकेच्या अथांग त्यागाची साक्ष आहेत! कोरोनाचा तो भीषण काळ, जेव्हा अवघे जग भीतीने कुलूपबंद झाले होते, तेव्हा मयुरी मॅडम आपल्या लेकरांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अहोरात्र तळमळत होत्या. त्या भयाण काळातही त्यांनी घेतलेल्या कष्टांचे चीज झाले—सलग तीन वर्षे पाचवीच्या शिष्यवृत्तीचा निकाल १००% लागला, एका विद्यार्थ्याने कोरोना काळातही शिष्यवृत्ती पटकावली आणि दोन होतकरू विद्यार्थ्यांची थेट ‘नवोदय विद्यालया’साठी निवड झाली! देवगड तालुका मिशन शिष्यवृत्ती असो वा डाएट सिंधुदुर्गचे ऑनलाईन मार्गदर्शन, त्यांनी ज्ञानाची गंगा अविरत वाहती ठेवली.

NEP 2020 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात (NCF) सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘District Consultation Report’ (DCR) तयार करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक प्रक्रियेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. एका बाजूला शाळेचा हा प्रचंड शैक्षणिक व्याप सांभाळताना, दुसऱ्या बाजूला रात्रीचा दिवस करून २०२३ मध्ये ‘एम.ए. इन एज्युकेशन’ आणि अत्यंत कठीण मानली जाणारी ‘एलएल.बी.’ (LLB) ही कायद्याची पदवी चक्क प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली! एका शिक्षिकेने संसाराची धुरा सांभाळत वकिलीचे शिक्षण अव्वल गुणांनी पूर्ण करणे, ही किती मोठी दुर्दम्य इच्छाशक्ती! त्यांच्या याच अफाट कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ कणकवलीने सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांना मानाच्या ‘Nation Builder Award’ ने सन्मानित केले.

ऑगस्ट २०२४ पासून त्या कणकवली तालुक्यातील ‘घोणसरी नं. ५’ शाळेत ज्ञानदानाचे नंदादीप तेवत ठेवत आहेत. तिथेही जाताच पाचवीच्या १००% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवून मार्गदर्शन केले, एका विद्यार्थ्याला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून दिला, तर एका विद्यार्थ्याची जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत राज्याबाहेर होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करून आणली! त्या ज्या शाळेत जातात, तिथे फक्त शाळा उभी राहत नाही, तर पिढ्या घडतात.

पोखरणच्या मातीतील ते संस्कार, संसाराची आव्हाने, बदल्यांचे खडतर मार्ग, स्वतःचे उच्च शिक्षण आणि हजारो मुलांच्या आयुष्याची चिंता वाहताना त्यांनी स्वतःच्या सुखाचा कधी विचारच केला नाही. अनेक रात्री जागून काढल्या असतील, स्वतःचे अश्रू डोळ्यांतच दाबून दुसऱ्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले असेल… हा प्रवास आठवला की अंतःकरण भरून येते आणि डोळ्यांतून नकळत कृतज्ञतेचे अश्रू ओघळतात.

घटस्थापनेच्या या मंगलमय पावन दिनी, ज्ञानाची आणि कायद्याची वज्रमूठ हाती बाळगून ग्रामीण विद्यार्थ्यांचे नशीब घडवणाऱ्या या कर्मयोगिनीच्या चरणी मानाचा मुजरा! आदिशक्ती जगदंबेने मयुरी मॅडमना अखंड ऊर्जा, उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावे. त्यांच्या त्यागातून पेटलेली ही ज्ञानज्योत अशीच तेवत राहो, याच शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आभाळभर मनःपूर्वक सदिच्छा!

 

©️ *प्रवीण अशितोष कुबलसर*

( ९८८१४७१६८४ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here