
समाधी जीर्णोद्धाराच्या कामाची व आरमारसृष्टी प्रकल्पाची केली पाहणी; ग्रामविकास मंडळाच्या वतीने सन्मान
देवगड/प्रतिनिधी
मराठा आरमाराचे प्रमुख आणि विजयदुर्ग किल्ल्याचे सरसेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान विजयदुर्ग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. तसेच विजयदुर्ग येथील मंदिरांमध्ये सहकुटुंब दर्शन घेतले.
विजयदुर्ग येथील रामेश्वर मंदिराशेजारी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तिसरे सरखेल संभाजी आंग्रे यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामाची रघुजीराजे आंग्रे यांनी पाहणी केली. त्यानंतर विजयदुर्ग येथे साकारण्यात येत असलेल्या हेलियम गॅलरी आणि आरमारसृष्टी प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली.
यावेळी इतिहासप्रेमी तथा विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे मुख्य सल्लागार श्री. राजेंद्र रघुनाथ परुळेकर यांनी प्रगतीपथावर असलेल्या आरमारसृष्टी प्रकल्पाची सविस्तर माहिती रघुजीराजे आंग्रे यांना दिली. विजयदुर्गच्या ऐतिहासिक वैभवाचे जतन आणि मराठा आरमाराचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
या भेटीदरम्यान विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे गावाध्यक्ष श्री. चंद्रकांत बिडये यांनी रघुजीराजे आंग्रे यांचे स्वागत केले. मंडळाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आरमारसृष्टी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर रघुजीराजे आंग्रे यांनी विजयदुर्ग येथील राममंदिर तसेच राधाकृष्ण मंदिरात विराजमान असलेल्या दुर्गादेवी मातेचे सहकुटुंब भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी दोन्ही नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे गावाध्यक्ष श्री. चंद्रकांत बिडये, मुख्य सल्लागार श्री. राजेंद्र परुळेकर, सचिव सौ. योगिता परुळेकर, मंडळाचे सदस्य तथा विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. महेश बिडये, शिवप्रेमी श्री. यशपाल जैतापकर, श्री. गणेश मिठबावकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव श्री. दीपक करंजे आणि श्री. अवधूत पाटील उपस्थित होते.
विजयदुर्गच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि मराठा आरमाराच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणाऱ्या या भेटीमुळे ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाच्या कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.



