तळेरे , येथे जागतिक टपाल दिन साजरा

0
9

डाक विभागाच्या इतिहासाची, पत्रसंस्कृतीची आणि आधुनिक तंत्रज्ञानातील बदलांची विद्यार्थ्यांना माहिती

तळेरे :

भारतीय डाक विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक असून, सुरक्षित आर्थिक व्यवहार, बचत योजना आणि टपाल सेवांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत विविध सुविधा पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत डाक विभागाने आधुनिक सेवांमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. पत्रांच्या माध्यमातून माणसांना जोडण्याचे आणि भावनांची देवाणघेवाण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डाक विभागाने अनेक दशकांपासून केले आहे.

डाक विभागाचा इतिहास, पत्रांचे महत्त्व, काळानुसार झालेल्या बदलांची माहिती तसेच विविध टपाल व बचत योजनांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने जागतिक टपाल दिनानिमित्त पीएम श्री जि. प. आदर्श शाळा तळेरे नं. १ येथे देवगड डाक उपविभागाच्या वतीने जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला.

यावेळी देवगड डाक उपविभागाचे ओव्हरशिअर विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना डाक विभागाचा इतिहास, पत्रव्यवहाराचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे टपाल सेवांमध्ये झालेले बदल यांची माहिती दिली. शाळेचे माजी अध्यक्ष राजेश जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पत्रे हे भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. मोबाईल आणि आधुनिक संपर्क साधने उपलब्ध होण्यापूर्वी बहुतांश संदेश व व्यवहार पत्रांच्या माध्यमातून केले जात असत. तातडीचा संदेश पाठविण्यासाठी तारसेवेचा, तर जवळच्या व्यक्तींना पैसे पाठविण्यासाठी मनीऑर्डरचा उपयोग केला जात असे. डाक विभाग हा सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांच्या जीवनाशी जोडलेला आपुलकीचा विभाग आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही पत्रसंस्कृतीची ओळख आणि डाक विभागाचे कार्य समजून घेणे आवश्यक असल्याचे राजेश जाधव यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला देवगड डाक उपविभागाचे कर्मचारी विकास चौधरी, तळेरे डाक कार्यालयाचे ग्रामीण डाक सेवक रघुनाथ लिंगायत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा देवकी तळेकर, उपाध्यक्षा अनुष्का गोसावी, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, सर्व शिक्षक आणि पालकवर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here